जेएसडब्ल्यू विरोधात शेतकरी आक्रमक

नैसर्गिक नाला पूर्ववत न केल्यास आत्मदहनाचा इशारा

| खरोशी | वार्ताहर |

जेएसडब्ल्यू कंपनीने गडब खारमाचेला येथील नैसर्गिक नाले बुजवून पाईप टाकल्याने येथील शेतकरी व मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे पाईप काढून नैसर्गिक नाला पुरवत करा अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा बापदेव शेतकरी मंडळाने दिला आहे.


पेण तालुक्यातील गडब गावातील खाडीकिनारी असलेल्या खारमाचेला सर्व्हे क्र. 94 येथे गावाकडून धरमतर खाडीच्या दिशेने जाणारा नैसर्गिक नाला पूर्वापार आहे. मात्र हा नाल्याचा मार्ग जेएसडब्ल्यू कंपनीने भराव करून बांध घालून चार सिमेंटचे पाईप टाकून बंद केला आहे.

गडब येथील मच्छिमार मच्छिमारीसाठी खाडीकडे येण्या-जाण्यासाठी नाल्याच्या पाण्यातून होडी घेऊन मासेमारीचा व्यवसाय करीत असत. मात्र, आता मार्गच बंद झाल्याने मच्छिमारी व्यवसायही बंद झाला आहे. परिणामी, गेली 10-12 वषार्र्ंपासून मच्छिमारी बंद झाल्याने शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत खारबंदिस्ती विभाग व संबंधित प्रशासन दखल घेत नाही म्हणून बापदेव शेतकरी मंडळाचे 20 ते 25 शेतकर्‍यांनी 26 डिसेंबर रोजी पेण उपविभागीय कार्यालयात सामूहिक आत्मदहन करण्याचा लेखी इशारा दिला आहे.

याबाबत बापदेव शेतकरी मंडळातर्फे अध्यक्ष सुनील कोठेकर, सुभाष कोठेकर, काशिनाथ कोठेकर, दिलीप कोठेकर, लहू कोठेकर, प्रवीण म्हात्रे, महेंद्र कोठेकर, सचिन कोठेकर इत्यादी शेतकर्‍यांनी पत्रकार परिषदेत आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, कार्यकारी अभियंता खारभूमी विभाग, जिल्हाधिकारी, उपविभागिय अधिकारी पेण यांना दिले आहे.

Exit mobile version