न्याय्य हक्कासाठी शेतकरी आक्रमक

अदानी व्हेंचर प्रकल्पाविरोधात उपोषण

| उरण | वार्ताहर |

धुतूम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. प्रकल्पात धुतूम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.20) पासून बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. या उपोषणाला धुतूम गावातील ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद देऊन पाठिंबा दिला आहे.

धुतूम गावाच्या हाकेच्या अंतरावर ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवणारी इंडियन ऑईल सध्याची इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. हा प्रकल्प 1997 साली उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीत हद्दीतील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनी संपादन करुन सिडकोला दिल्या आहेत. मात्र, मागील 18 वर्षांपूर्वी सदर कंपनीत तीन कायमस्वरूपी कामगार व 24 कंत्राटी कामगार म्हणून धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना सामावून घेतले. त्यानंतर सदर प्रकल्पात बाहेरील 100 कामगारांची भरती करुन स्थानिक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे.

या प्रकल्पात धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना व गावातील बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोमवारी (दि.20) उपोषण सुरू करण्यात आले आहे. जवळ जवळ संपूर्ण धुतूम गावातील सर्वपक्षीय मंडळी या आंदोलनात सहभागी झाली आहे. धुतूम ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे अदानी व्हेंचर्स प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात खासगी बंदोबस्त ठेवला होता. या आंदोलनात सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील, ग्रामपंचायत सदस्या स्मिता ठाकूर, सुचिता कडू, अनिता ठाकूर, करिश्मा ठाकूर, रविनाथ ठाकूर, प्रकाश ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर यांच्यासह प्रकल्पबाधित 83 शेतकरी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रकल्पातील अधिकारी वर्गाने धुतूम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्यांना आपल्या प्रकल्पात कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा तेव्हाच आमरण उपोषण सोडणार असल्याचा निर्धार धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर व ग्रामपंचायत सदस्य, प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version