औद्योगिक क्षेत्राविरोधात शेतकऱ्यांचा संताप; पूरस्थितीने नुकसान
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीबरोबरच धाटाव औद्योगिक क्षेत्रातून कथितरित्या सोडण्यात आलेले रासायनिक सांडपाणीही पूराच्या पाण्यासोबत शेतांमध्ये शिरल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नुकतीच केलेली भात पेरणी मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने खारापटीसह तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून भात पेरणी केली होती. मात्र, पूर ओसरल्यानंतर अनेक शेतांमधील भाताची रोपे पिवळी पडलेली, कुजलेली तसेच वाळलेली दिसून येत आहेत. काही ठिकाणी उगवण झालेली रोपे पूर्णपणे नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे आधीच वाढलेल्या शेतीखर्चात आणखी भर पडणार असून, पुन्हा पेरणी करण्यासाठी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीचा फायदा घेत धाटाव औद्योगिक क्षेत्रातील काही उद्योगांकडून रासायनिक सांडपाणी कुंडलिका नदीत सोडले जाते. हे दूषित पाणी पूराच्या प्रवाहासोबत शेतांमध्ये येत असल्याने जमिनीची सुपीकता कमी होण्याबरोबरच पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र ठोस कारवाई झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पूर ओसरल्यानंतर अनेक शेतांमध्ये दिसून आलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन शेतातील आणि नदीतील पाण्याचे नमुने तपासावेत, नुकसानीचे पंचनामे करावेत तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी उद्योगांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत, दुबार पेरणीसाठी विशेष अनुदान, बियाणे आणि खतांचे मोफत वाटप तसेच शेतीचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशीही मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित औद्योगिक क्षेत्रातील उद्योग किंवा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. त्यामुळे पिकांच्या नुकसानीमागे पूराचे पाणी, कथित रासायनिक सांडपाणी किंवा इतर कारणे आहेत का, याबाबत अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट चित्र समोर येणार आहे.







