शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठीअर्ज करण्याचे आवाहन

| रायगड | प्रतिनिधी |

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2023-24 मध्ये मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांना इतर राज्यातील शेती उद्योगांची माहिती व्हावी, यासाठी राज्याबाहेरील अभ्यास दौरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी केले आहे. राज्याबाहेर अभ्यास दौरा राबविताना शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेत स्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतः ची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे या बाबीसाठी शेतकऱ्यांचा राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

अभ्यास दौरा कर्नाटक राज्यातील तीन ठिकाणी मैसूर-कर्नाटका, सी.एस.आय.आर.सेन्ट्रल फुड तंत्रज्ञान आणि संशोधन, बंगलोर वाई आय.सी.ए.आर डायरेक्टरेट ऑफ कॅशू रिसर्च, मोत्तेबडका, पुडुर येथे भेट देण्यासाठी आयोजित केला आहे. या प्रशिक्षणार्थीची निवड अर्ज प्राप्त झाल्यास विहित पध्दतीने अर्जाची सोडत काढून, ज्येष्ठता सुचीनुसार अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. ई-केवायसी, आधार लिंक बँक खाते, मँगोनेट व जी.आय.मानांकन अधिकृत बापरकर्ते, ई-पीक पाहणी करणारे शेतकरी व महिला/अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटातील सदस्यांना प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी दि.5 जानेवारी 2024 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे मार्गदर्शक सुचनेनुसार विहीत अर्ज, सात बारा, 8 अ, आधार कार्ड व छायाचित्रासह अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version