| खरोशी | वार्ताहर |
पेण तालुक्यातील 12 हजार 400 हेक्टरवरील भातशेती कापणीस तयार झाली असून, तालुक्यातील भातशेती कापण्यासाठी मजुरांच्या घरापर्यंत शेतकरी जात असल्याने मोठ्या संख्येने येणार्या आदिवासी मजुरांना विनवण्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कापणीसाठी 800 रुपये जेवण, उतार खर्च यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. तर, दुसरीकडे मजुरांची दिवाळीच दिवाळी सुरु झाली आहे.
यावर्षी उत्तम भातशेती आली असताना सतत पडणार्या पावसाने भातशेती वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. तालुक्याच्या ठिकाणी मजुरांची टंचाई निर्माण झाली, त्यामुळे चढ्या भावाने मजुरांना घेऊन जावे लागत आहे. पहाटे 4 ते 5 वाजता शहरातील नगरपालिका नाक्यावर येऊनदेखील मजूर मिळत नसल्याने रिकाम्या हाताने माघारी जावे लागत आहे. तर, दुसरीकडे शेतकर्यांनीच मजुरांचे दर वाढल्याने शेतकर्यांमध्ये भांडणे निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, वाढत्या मजुरीमुळे शेतकरी पूर्णतः मेटाकुटीला आला असून, भाताच्या उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत असल्याने बळीराजाला शेती नकोशी झाली आहे. दिवसेंदिवस मजुरांचा प्रश्न निर्माण होत असून, बहुतेक शेतकरी शेतीकडे पाठ फिरवताना दिसून येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी भातशेती ओसाड पडू लागली आहे.