शेवगा उत्पादनाकडे शेतकर्‍यांचे लक्ष

कमी खर्चात अधिक पैसा ; जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड

| तळा | वार्ताहर |

सध्या पौष्टिक खाद्य म्हणून शेवगाच्या शेंगांना महत्त्व आले आहे. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शेतकरी आता शेवग्याकडे महत्त्वाचे पीक म्हणून पाहत आहे. शिवाय कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक असल्याने याच्या उत्पादनात वाढ झाली आहे. शेवगा हे झाडाला येणारे पीक आहे. याची झाडे शक्यतो शेताच्या बांध्यावर लावण्यात येतात. त्याला योग्य प्रमाणे पाणी दिल्यास हे पीक जोमदार येते. शिवाय या झाडाची वाढ झपाट्याने होत असते. तसेच जमीन भुसभुशीत असलेल्या ठिकाणी असलेल्या झाडांवर मोठ्या प्रमाणात शेंगा लागतात.

अगदी भात कापणी नंतर लगेचच याला फुलोरा धरतो. जानेवारीत झाडावर मोठ्या प्रमाणावर शेंगा लागतात. या शेंगा खूप चविष्ट व रुचकर लागतात. त्यामुळे शेंगांना खूप मागणी असते. शिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात. त्यामुळे शेवग्याला आंतरराष्ट्रीय देखील मागणी आहे. विदेशात देखील मोठ्या प्रमाणावर शेवगाच्या शेंगा निर्यात केल्या जातात. सध्या बाजारामध्ये 20 रुपयांपासून ते 40 रुपयापर्यंत याची जुडी विकली जाते. कोरोना काळात शेंगांच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. तर काही ठिकाणी चक्क शंभर रुपये जुडी विकली जात होती. त्यामुळे या पिकाकडे आता शेतकरी विशेष लक्ष देऊ लागला आहे.

Exit mobile version