अवकाळीच्या तडाख्याने शेतकरी उध्वस्त

माणगाव तालुक्यात जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान

। माणगाव । प्रतिनिधी ।

गेल्या काही दिवसा पासून पुणे तसेच मराठवाडा भागात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे पडसाद आता कोकणातही उमटू लागले असून, रायगड जिल्हातील माणगाव तालुक्यात गुरुवारी (दि.2) दुपारी अचानक झालेल्या अवकाळीच्या पावसाने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हवामानातील वातावरणात मोठे बदल जाणवत होते. त्यातच अचानक झालेल्या पावसाच्या तडाख्यामुळे काही काळ माणगावची बाजारपेठ ठप्प झाली. नागरिकांची तारांबळ उडाली, तर काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला होता. त्यामुळे शेतीला मोठा फटका बसला असून, तालुक्यात सध्या कडधान्य पिकांची काढणी आणि मळणी सुरू आहे. वाल, मुग, पावटा, चवळी, हरभरा ही पिके शेतात किंवा मळणीत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने मोठे नुकसान झाले आहे. तर काही शेतांमध्ये उभे असलेले कलिंगड पिकही धोक्यात आले आहे.

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा-काजू बागायतदारांचे पुरते कंबरडे मोडले आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू या फळपिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः आंब्याची मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलांमुळे अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्या भीतीचे वास्तवात रूपांतर झाले असून, आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. त्यामुळे माणगाव तालुक्यातील शेतकरी बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन बिघडले असून, नुकसान भरपाईची मागणी जोर धरत असून प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून मदत देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुढील काही दिवस सतर्कतेचे
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळी पावसाच्या वाढत्या घटनांकडे केवळ नैसर्गिक आपत्ती म्हणून पाहून चालणार नाही. हे बदलत्या हवामानाचे गंभीर संकेत आहेत. कोकणा सारख्या पारंपरिक दृष्ट्या स्थिर हवामान असलेल्या भागातही अशा अनियमित पावसाची पुनरावृत्ती होत असल्याने शेती व्यवस्थेचे नियोजन नव्याने करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्या बरोबरच दीर्घकालीन उपाययोजना पिक विमा, हवामान आधारित शेती सल्ला आणि साठवण सुविधा याकडे शासनाने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.
Exit mobile version