। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथील प्रगतशील शेतकरी बी. सी. म्हात्रे यांच्या शेतावर कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि.28) आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या तयारीला चिरनेर येथील शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रशिक्षणासाठी चिरनेर येथील सुजलाम शेतकरी गट व श्री महागणपती शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून शेती विषयक महत्त्वाची माहिती जाणून घेतली. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना गट शेतीचे महत्त्व आणि शेतीतील नवीन व्यवस्थापन पद्धती शिकवून व्यवसायाभिमुख दृष्टिकोन विकसित करणे हा होता.
एकत्रित गट शेतीमुळे संसाधनांचा प्रभावी वापर करणे, मोठी बाजारपेठ मिळवणे आणि उत्पादन खर्च कमी करणे यांसारखे फायदे होत असतात. या संदर्भात प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना सज्ज करणे, हा यामागील मुख्य हेतू आहे.
पाणी फाऊंडेशनचे मार्गदर्शक आशिष लाड यांनी फार्मर कप स्पर्धेचे नियम, विविध टप्पे आणि शेती व्यवस्थापनातील नव्या पद्धती याबाबत मार्गदर्शन केले. तर उपस्थित प्रशिक्षकांनी स्पर्धेची गरज, अंमलबजावणीचे टप्पे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांच्या भूमिकेबाबत सविस्तर माहिती देऊन चर्चा केली.
कृषी सहाय्यक अधिकारी आदीका पानसरे यांनी फार्मर कप स्पर्धेचे महत्त्व आणि शेतीच्या व्यवस्थापन प्रणालीतील नवीन बदलांविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी 2026 च्या खरीप हंगामापासून सुरू होणाऱ्या सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहनही केले.
याप्रसंगी उरण-चिरनेर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित राहून फार्मर कप स्पर्धेत सहभागी होण्याचा आणि तंत्रज्ञान व व्यवसायाभिमुख दृष्टिकोन आत्मसात करण्याचा निर्धार व्यक्त केला.
फार्मर कपसाठी शेतकरी सज्ज
