कर्जत प्रेस क्लबतर्फे शेतकऱ्यांचा सन्मान

| कर्जत | प्रतिनिधी |

रायगड प्रेस क्लब संलग्न कर्जत प्रेस क्लबच्या माध्यमातून गौरकामत येथील प्रगतशील शेतकरी अनिल देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. यावेळ कृषी अधिकारी चिंतामण लोहकरे, माजी सरपंच प्रकाश ठकेकर, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख, जिल्हा सल्लागार विजय मांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्याध्यक्ष गणेश पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राहुल देशमुख यांनी प्रास्ताविकात उपक्रमाचा उद्देश सांगितला. स्वर्गीय जेष्ठ पत्रकार संतोष पवार यांनी शेतकऱ्यांचा सन्मान हा त्यांच्या शेताच्या बांधावर करायचा या संकल्पनेला जिल्ह्यातील प्रेस क्लबने प्रोत्साहन दिल्यामुळेच हा नाविन्यपूर्ण उपक्रम पुढे तालुकास्तरावर सुद्धा राबवण्यात येऊ लागला.

यंदा कर्जत तालुक्यातील काळ्या तांदुळाची शेती करणारे बेकरे येथील शेतकरी चंद्रकांत हाबळे, नोकरी व्यवसाय सांभाळून विविध भाजीपाल्याची शेती करणारे गौरकामत येथील शेतकरी अनिल देशमुख, पारंपरिक शेती जोपासतानाच त्याच वेगळा प्रयोग म्हणून तालुक्यात पहिल्यांदाच खेकडा शेती, कुकूटपालन व सेंद्रिय शेती करणारे पोटल येथील शेतकरी दीपक श्रीखंडे, कर्जत तालुक्यात पहिल्यांदा पांढऱ्या कांद्याचा यशस्वी प्रयोग करून केवळ 20 गुंठ्यात दोन हजार किलो कांद्याचे उत्पन्न घेणारे नेरळ येथील शेतकरी अंकुश शेळके, तर ओसाड माळावर पाण्याचा थेंब नसताना शेती करायची असा निश्चय करून शेतात उतरून फळबाग फुलवणारे ओलमण येथील आदिवासी शेतकरी प्रभाकर पादीर आदींचा सन्मान आदर्श शेतकरी म्हणून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन विलास श्रीखंडे यांनी केले तर भूषण प्रधान यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी उद्योजक प्रफुल्ल म्हसे, अशोक मोरे, निलिकेश दळवी, जयवंत हाबळे, मल्हार पवार, अजय गायकवाड, दीपक पाटील, ज्ञानेश्वर बागडे, आनंद सकपाळ आदींसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version