जंगलात कातडी, मृत वासराचे अवशेष; पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील मोर्बा विभागातील बोर्ले परिसरात जनावरे चोरीला जाण्याच्या सलग घटनांनी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यातच नाईटणे गावाजवळील जंगलात जनावरांची कातडी व मृत वासराचे अवशेष आढळल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. हे अवशेष चोरीला गेलेल्या जनावरांचे आहेत का, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही.
10 सप्टेंबर रोजी बैलपोळ्याच्या दिवशी बोर्ले येथील शेतकऱ्याचे शर्यतीचे दोन बैल बेपत्ता झाले. शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. त्यानंतर दोन गाई व दोन खोंडे चोरीला गेल्याची तक्रारही करण्यात आली असून, यातील एक गाय गाभण असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नाईटणे गावाजवळील जंगलात जनावरांची कातडी व मृत वासराचे अवशेष आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून, चोरीला गेलेली जनावरे कुठे नेली जातात, जंगलातील अवशेष कोणत्या जनावरांचे आहेत आणि या घटनांमागे एकच टोळी आहे का, याचा तपास सुरू आहे.
संबंधित शेतकरी व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर चोरी व इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलीस तपास करीत आहेत. जनावरे हा शेतकऱ्यांच्या संसाराचा आर्थिक आधार असल्याने चोरीच्या घटनांना आळा घालून जनावरांचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे.
