| नेरळ | वार्ताहर |
खरीप हंगामात भात आणि नाचणी पीक 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रायगड जिल्हा स्तरावर नाचणी पीक स्पर्धेत कर्जत तालुक्यातील शेतकर्यांनी पहिले तिन्ही क्रमांक पटकावले आहेत. त्याबद्दल कोकण विभागीय कृषी सहसंचालक पातळीवर नाचणी परिसंख्येत यशस्वी झालेल्या तालुक्यातील त्या तिन्ही शेतकर्यांना सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र तृणधान्य 2024 अंतर्गत विभागीय मिलेट कार्यशाळा मुलुंड येथे आयोजित करण्यात आलेली होती. या कार्यशाळेत जिल्हास्तरीय नाचणी पीक स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. नाचणी पीक स्पर्धेत कोकण विभागात प्रथम क्रमांक तालुक्यातील शेतकरी दत्तात्रय निरगुडा यांनी हेक्टरी 12 क्विंटल 23 किलो एवढे विक्रमी उत्पादन घेतले. नाचणी पीक स्पर्धेतील हा विक्रम असून त्याबद्दल जिल्हा विभागाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक कृषी विभागाचे कोकण विभागीय सहसंचालक अंकुश माने यांचे हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. दत्तात्रय निरगुडा हे तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत येथील शेतकरी आहेत. नाचणी स्पर्धेत दुसरा क्रमांक तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीमधील शेतकरी मनू सराई हेक्टरी 11 क्विंटल 29 किलो उत्पादन काढून पारितोषिक पटकावले. तिसरा त्याच भागातील शेतकरी रवींद्र निरगुडा यांनी हेक्टरी 11 कविताला 19 किलो एवढे उत्पादन घेतले आहे आणि त्याबदल तिसरा क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमात कर्जत येथील मंडळ कृषी अधिकारी दिनेशकुमार कोळी यांना पौष्टिक तृणधान्य 2023 अभियान यशस्वीपणे राबविण्यात आल्याबद्दल प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.