। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील कानसई ते वडखळ येथे उच्चदाब विद्युत वाहिन्या टाकण्यास विरोध असून, ठेकेदार राम घरत अरेरावी करत असल्याची तक्रार युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत शेतकर्यांनी प्रांत कार्यालयात केली आहे.
जनशक्ती संघर्ष कोलेटी सामितीने आपल्या जमिनीमध्ये महापारेषणच्यावतीने उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्यास विरोध केला असून, ही लाईन टाकताना शेतकर्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही लाईन शेतकर्यांच्या जमिनीवरुन गेल्यास भविष्यात शेतीचे मुल्याकंन घटणार असल्याने जनशक्ती संघर्ष समितीने भाजप उपजिल्हा अध्यक्ष वैकुंठ पाटील यांची तातडीने भेट घेतली. वैकुंठ पाटील यांनी झालेला प्रकार विचारात घेऊन तातडीने उपविभागीय कार्यालय गाठले. उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांना शेतकर्यांची करुण काहाणी सांगितली व तातडीने विद्युत लाईनचे काम बंद करण्याची विनंती केली.
याशिवाय ठेकेदार शेतकर्यांशी अरेरावीने वागत असून ठेकेदार राम घरत हा स्वतः जमिनीचा मालक असल्याच्या तोर्यात शेतकर्यांसोबत चुकीची भाषा वापरत असल्याचे सांगत प्रांत कार्यालयात व प्रसार माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली. महत्वाची बाब म्हणजे महापारेषणच्यावतीने लोखंडी मनोरे उभे करण्यासाठी काही शेतकर्यांशी आर्थिक व्यवहार केला आहे. परंतू ज्यांच्या जमिनीवरुन उच्चदाब विद्युत लाईन जाणार आहेत त्यांना विचारणा करण्यात आली नाही.
उच्चदाब विद्युत वाहिनीच्या कामाला आमचा विरोध नाही. परंतू ही लाईन टाकताना शेतकर्यांचे नुकसान होणार नाही, याची पुर्ण जबाबदारी महापारेषण विभागाने घ्यावी. तसेच ही विद्युत वाहिनी टाकताना धरमतर खाडीच्या बाजूने टाकल्यास शेतकर्यांचे नुकसान होणार नाही. म्हणून पूर्ण लाईनचे काम करत असताना हे खाडीच्या बाजूने व्हावे, अन्यथा एक फुटदेखील लाईन टाकू देणार नाही.
वैकुंठ पाटील,
युवा नेते
संबंधित कामाची चौकशी करुन तातडीने बैठक बोलवली जाणार काम नक्की काय आहे, याबाबत मला काहीही कल्पना नाही. परंतू या कामाची माहिती घेऊन संबंधित विभागांना शेतकर्यांबरोबर एकत्र करुन बैठकीचे आयोजन केले जाईल.
प्रवीण पवार,
उपविभागीय अधिकारी, पेण
महापारेषण कंपनीची उच्चदाबाची विद्युत वाहिनी शेतावरुन गेल्यास भविष्यात शेतीचे मुल्याकंन घटणार असून, आमच्या शेतीवर कोणतेही प्राजेक्ट राबविता येणार नाही. ही वाहिनी धरमतर खाडीच्या बाजूने न्यावी. अन्यथा सध्या जेएसडब्ल्यू कंपनी ज्या दराने जमिनी खरेदी करीत आहे, तो दर आम्हा शेतकर्यांना दयावा. हे मान्य नसल्यास येत्या आठवड्याभरात प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करु.
प्रभाकर डाकी,
अध्यक्ष, जनशक्ती संघर्ष समिती