धरणग्रस्तांच्या कायम पाठीशी; जयंत पाटील यांचे शेतकर्यांना आश्वासन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात ठाणे जिल्ह्यातील महानगरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून बोरगाव येथे धरण बांधले जाणार आहे. गेली 40 वर्षे ही चर्चा सुरु असून, स्थानिक शेतकर्यांनी या धरणाला कायम विरोध केला आहे. आता पुन्हा ठाणे जिल्ह्यातील राजकारणी मंडळींकडून पोशीर धरणाचा विषय पुढे आणला जात असल्याने स्थानिक सहा गावांतील शेतकर्यांनी शेकापचे नेते माजी आमदार जयंत पाटील यांना निवेदन देऊन शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी केली होती. दरम्यान, जयंत पाटील यांनी शेतकर्यांच्या पाठीशी आपला पक्ष ठामपणे उभा राहील, असे आश्वासन बोरगाव येथे शेतकर्यांच्या बैठकीत दिले आहे.
भीमाशंकर अभयारण्य डोंगरात उगम पावलेली पोश्री नदीवर बोरगाव आणि कुरुंग गावांच्या हद्दीत धरणाची मुख्य भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, विरोध कायम ठेवणारे बोरगाव भागातील शेतकरी यांनी शेतकरी कामगार पक्षाकडे पाठिंबा मागितला होता आणि त्यानुसार शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी बोरगाव येथे येऊन सभा घेतली. त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तानाजी मते, तालुका चिटणीस श्रीराम राणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष प्रकाश फराट, खालापूरचे अध्यक्ष संतोष जंगम, विभाग चिटणीस पांडुरंग बदे, सरपंच प्रमोद कोंडिलकर, माजी सरपंच कृष्णा बदे आदी उपस्थित होते. पोशीर धरण ज्या भागात होऊ शकते, त्या बोरगाव, उंबरखांड, पेंढरी, भोपळेवाडी, चई चेवणे या गावांतील शेतकर्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती.
दरम्यान, जयंत पाटील यांनी पोशीर धरणाला स्थानिक शेतकर्यांचा विरोध आहे. त्यात त्या भागात 100 टक्के भाजीपाला, भाताची शेती यांचे उत्पादन घेतले जाते. असे असताना हिरव्यागार जमिनीवर नांगर फिरवला जात असेल तर या धरणाला शेतकरी कामगार पक्षाचा विरोध असून, आमचा पक्ष शेतकर्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असेल, असे जाहीर आश्वासन दिले आहे. त्याचवेळी या भागात धरण होऊ नये ही जर शेतकर्यांची मागणी असेल, तर आमच्या पक्षाचीदेखील तीच भूमिका राहील, असे स्पष्ट आश्वासन जयंत पाटील यांनी दिले आहे.
या धरणाच्या विरोधाच्या वेळी मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. तुम्ही म्हणता तर आपल्याला जमीन द्यायची नाही.परंतु, आपण सर्वांनी शासन आपल्याला जमिनीच्या बदल्यात काय देणार आहे, याचा पण अभ्यास करावा, अशी सूचना जयंत पाटील यांनी केली. सिडको आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचा संबंध या प्रकल्पाशी किती आहे, हेदेखील शेतकर्यांनी समजून घ्यावे आणि सिडकोसारखे साडेबारा टक्के प्लॉट आणि मोबदला शासन आपल्याला देणार असेल, तर त्याचा विचार आपण नंतर करू, असेही जयंत पाटील म्हणाले.
सध्या आपली भूमिका ती माझी भूमिका असून, मी एकदा शब्द दिला तर मागे हटत नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे शेतकर्यांनी गावागावात जाऊन बैठका घ्याव्यात आणि आपली एकजूट आणखी भक्कम करावी.
जयंत पाटील,
सरचिटणीस, शेकाप