रिलायन्सची भिंत स्थानिकांच्या मुळावर

पोलीस बळाचा वापर करुन काम सुरू; ग्रामस्थ, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नागोठणे कंपनीच्या संलग्न बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीत नवीन प्रकल्पाची उभारणी होत आहे. मात्र, हा प्रकल्प उभारत असताना स्थानिक, भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, पशुपालक, मत्स्यव्यवसायिक यांच्या मागण्यांची आणि तक्रारींची रिलायन्स व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात दखल व पूर्तता होणार असल्याची कोणतीही विश्‍वासार्ह हमी आजवर दिली गेलेली नाही. अशातच ऐन निवडणुकीत पोलीस बळाच्या वापराने रिलायन्स नागोठणे कंपनी व्यवस्थापन बेणसे सिद्धार्थनगर (बौद्धवाडी) गावालगत 30 फुटांची आवाढव्य भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, ही भिंत स्थानिकांच्या व भविष्यातील पिढ्यांच्या मुळावर उठणार असल्याची संतप्त भावना येथील नागरिक मांडत आहेत.

कोणताही प्रकल्प आला तर तेथील स्थानिकांना, प्रकल्पग्रस्तांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल, गाव-वाड्या-वस्त्यांचा विकास साधेल ही भाबडी आशा ठेवून शेतकरी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने देतात व अपवाद वगळता अनेक ठिकाणी या दिलेल्या आश्‍वासनाची प्रकल्पधारकाकडून पूर्तता होत नाही, तर सर्रास फसवणूकच केली जाते, ही रायगड जिल्ह्यातील वास्तव स्थिती आहे. अनेकदा प्रकल्प उभारताना हुकूमशाही पद्धतीने स्थानिकांची शेतकर्‍यांची गळचेपी करण्याचे कारस्थानदेखील होते. सद्यःस्थितीत येथील स्थानिकांमध्ये संभ्रम आणि अविश्‍वासाची भावना उफाळून आली आहे. तर इथं गावालगत मोठ्या जलदगतीने बांधण्यात येणार्‍या 30 फुटी भिंतीला स्थानिक गावकरी, शेतकर्‍यांनी कडाडून विरोध करीत हे काम तातडीने थांबवावे, अशी जोरदार मागणी केली आहे. जोपर्यंत रायगड जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्यासमवेत बैठक होऊन स्थानिकांच्या, शेतकर्‍यांच्या मागणी आणि प्रश्‍नावर समाधानकारक तोडगा निघत नाही, तोपर्यंत गावाचा कोंडमारा करणार्‍या या भिंतीला विरोधच राहील, अशी स्पष्ट भूमिका बेणसे झोतिरपाडा येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. यासंदर्भात स्थानिकांनी आपले तक्रारी निवेदने मंत्रालयस्तरावर दिलेली असून, रायगड जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी पेण यांनादेखील दिलेली आहेत. मात्र, अद्याप या निवेदनांची कोणतीही दखल घेतली नसल्याची नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

प्रांताधिकारी पेण यांनी रिलायन्स व्यवस्थापन, प्रकल्पग्रस्त, स्थानिक आणि शेतकरी यांच्या बैठकीचे आश्‍वासन देऊन देखील का पाळले नाही, पोलीस अधीक्षक यांनादेखील स्थानिकांचे प्रश्‍न सुटेपर्यंत पोलीस बंदोबस्त देऊ नये या तक्रारी अर्जाचीदेखील घेण्यात आली नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिक शेतकरी दत्ता तरे म्हणाले की, नवीन प्रकल्प उभारताना स्थानिक शेतकर्‍यांच्या मागण्या पायदळी तुडवल्या जात आहेत. प्रशासन जनतेचे आहे की धनदांडग्या उद्योजकांचे आहे. रिलायन्सकडून शेतकर्‍यांसाठी रस्त्याचे प्रयोजन काय याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या भिंतीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे. पुराच्या पाण्याचा मोठा धोका पिकांना बसणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम 1961 कलम 42 (4)अन्वये कोणत्याही भूखंडधारकाने पाच वर्षे किंवा अधिक कालावधीकरिता सदर भूखंडाचे बांधणीयोग्य क्षेत्र वापरले नाही तर इतर कोणताही उद्योग सामावून घेण्यासाठी त्याचा वापर करता येईल. त्या अनुषंगाने स्थानिक शेतकरी सदर जमिनीवर नवीन उद्योग सुरु करण्याकामी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याकडे मागणी करणार आहोत, असे दत्ता तरे म्हणाले.

बौध्दजन समाज सेवा संघांचे अध्यक्ष तथा संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे म्हणाले की रिलायन्स कंपनी बळजबरीने आमच्या बेणंसे सिद्धार्थनगर गावाला लागून 30 फुटी भिंत बांधत आहे. आमचा पिढ्यानपिढ्या असलेली वहीवाट बंद करीत आहे, आमचे वाहने पार्किंग स्थळ नष्ट करीत आहे. मुलांचे खेळाचे मैदान देखील नष्ट करीत आहे. आमच्या गावांत जाणारा येणारा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे स्मशान भूमीच्या बाजूला आमची वाहने थांबवली जातात. मात्र या भिंतीमुळे आमचे व आमच्या पुढील पिढ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. बौद्धवाडी मध्ये जर कोणती आपत्कालीन दुर्घटना घडली तर रुग्णवाहीका येण्या जाण्याइतका देखील रस्ता रिलायन्स कंपनी देत नाही. हा बौद्ध समाजावर व येथील शेतकर्‍यांवर मोठा अन्याय होत असल्याचा संताप बबन अडसुळे यांनी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त केला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांचे भविष्यात नव्याने होणारे प्रकल्प व इतर कामांबाबत ग्रामपंचायतीना त्याची माहिती मिळावी. तसेच ग्रामसभांना व आपणामार्फत जनसुनावणी आयोजित करून सर्व प्रकल्पाची माहिती शेतकरी व नागरिकांना मिळावी. शेतकरी, प्रकल्पबाधित नागरिक व आंबेडकरी अनुयायी यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा भविष्यात आपल्या न्याय्य हक्कासाठी मोठं आंदोलन उभारू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

कंपनीच्या जागेमध्ये संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. कंपनीच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे बांधकाम करण्यात आले असल्याची माहिती कंपनी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Exit mobile version