हजारो वृक्ष, झुडपे, जैविविधता नष्ट
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील बेणसे सिध्दार्थ नगर गावाच्या लगत मंगळवारी (दि.25) दुपारी अचानक आगीने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. गावाला आगीने घेराव घातल्याने गावकरी भयभीत झाले होते. यावेळी ग्रामस्थांनी समय सुचकता राखत आपापल्या परीने आग विजविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, कडाक्याचे उन असल्यामुळे सुकलेल्या पालापाचोळ्याने भयंकर पेट घेतला होता. आग नियंत्रणाबाहेर गेल्याने तातडीने रिलायन्स कंपनीकडून अग्निशमन बंब बोलविण्यात आले आणि त्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. परंतु, हजारो वृक्ष, झुडपे व जैविविधता नष्ट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, रिलायन्स व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी अविनाश श्रीखंडे, गौतम मुखर्जी, नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना मोबाईलवर संपर्क करून घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवून महत्वपूर्ण सहकार्य केले. या आगीच्या घटनेत ग्रामस्थ, संघर्ष समितीचे पदाधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी तांबे, कर्मचारी तुकाराम वाळंज, परशुराम भोईर व सहकार्यांची मदत मिळाली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. परंतु, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अस्पष्ट आहे. मात्र, भविष्यात अशा स्वरूपाची एखादी आपत्ती अथवा मोठी दुर्घटना घडली तर त्यावेळी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे वाहन कुठून आणावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बेणसे बौद्धवाडी लगत रिलायन्स कंपनी संरक्षण भिंत उभारत आहे. त्यामुळे आपत्ती काळात मदतकार्य करणारे अग्निशमन बंब, रुग्णवाहिका येण्याठीचा रस्ताच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मोठे वाहन जाईल असा रस्त देण्यात यावा, अशी जोरदार मागणी बेणसे सिद्धार्थनगर ग्रामस्थ व शेतकर्यांनी केली आहे.
अन्यथा गाव खाक झाले असते
बेणसे झोतीरपाडा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे म्हणाले की, कोणतीही आपत्ती व दुर्घटना सांगून येत नाही. अशातच रिलायन्स नागोठणे कंपनीचा नवा प्रकल्प हा बेणसे झोतीरपाडा ग्रामपंचायत हद्दीलगत व बेणसे बौद्धवाडीला लागून उभारला जात आहे. हा प्रकल्प उभारताना गावालगत 30 फुटी संरक्षण भिंत उभारण्याचे काम होत आहे. मात्र, या कामाला स्थानिक संघर्ष समितीने विरोध दर्शविला आहे. सद्यस्थितीत हे काम थांबवले नसते व येथे भिंत उभी राहिली असती तर आजच्या दुर्घटनेत अग्निशमन बंब वाहन हे गावापर्यंत तातडीने येणे कठीण झाले असते. हे वाहन सी टाइप वसाहत येथून मार्ग काढून आणण्यात आले. या वाहनाला येण्यास मार्ग मिळाला नसता तर संपूर्ण बेणसे सिध्दार्थ नगर गाव जळून खाक झाले असते, असे बबन अडसुळे यांनी सांगितले आहे.