शेतकर्‍यांचा ‘पंजाब बंद’; रेल्वेसेवेवर मोठा परिणाम

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आता आक्रमक झाले आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 30) पंजाब बंदची हाक देण्यात आली होती. पंजाबमध्ये शेतकर्‍यांच्या बंदमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या आंदोलनामुळे 221 गाड्या रद्द करण्यात आल्या, तर अनेक गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. तसेच रस्ते वाहतूक आणि विमान सेवेवरही बंदचा परिणाम झाला.

संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी हा बंद पुकारला आहे. बंदच्या काळात वैद्यकीय सेवेसह अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. पिकांसाठी एमएसपी हमी कायद्यासह 13 मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यासाठी सोमवारी पंजाब बंदची हाक देण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पंजाबमध्ये 200 ठिकाणी रस्ते रोखण्यात आले होते. जालंधर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग आणि अमृतसर-दिल्ली महामार्गावर शेतकरी ठाण मांडून बसले होते. मोहालीत विमानतळ रस्ता रोखण्यात आला होता. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 600 पोलीस तैनात करण्यात आले होते. एसजीपीसीसह अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. पंजाब बंददरम्यान आपत्कालीन सेवा सुरू होत्या. पंजाबमधील हिवाळ्याच्या सुट्ट्यांमुळे शाळा बंद आहेत. संपामुळे पंजाब विद्यापीठाने सोमवारऐवजी मंगळवारी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version