। चिरनेर । प्रतिनिधी ।
उरण तालुक्यात तिसऱ्या मुंबईच्या ड्रोनसर्व्हेसाठी येणाऱ्या कामगारांना शेतकरी हुसकावून लावत आहेत. सारडे, चिरनेर पाठोपाठ खोपटे येथील सर्वेक्षणासाठी आलेल्या कामगारांना शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि.27) हुसकावून लावून, रंगाने आखलेले पट्टे पेटवून दिले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध केला.
सरकारने केएससी नवनगरच्या (कर्नाळा, साई, चिरनेर) या तिसऱ्या मुंबईची घोषणा करून उरण, पनवेल, पेण तालुक्यातील 124 महसूल गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्याची तयारी सुरू केली. यासाठी सरकारने गावोगावी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. मात्र, एमएमआरडीएच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित तिसऱ्या मुंबईसाठी साडे बावीस टक्के योजनेअंतर्गत भूसंपादनास शेतकऱ्यांनी या आधीच विरोध दर्शविला आहे. 25 हजार शेतकऱ्यांनी हरकती देखील नोंदविल्या आहेत. शासनाविरोधात संघर्षही सुरू केला आहे. खोपटे विभागात सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कामगारांना सर्वपक्षीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः हुसकावून लावले. रंगाने आखलेल्या पट्ट्यांना संतप्त शेतकऱ्यांनी पेटवून देत, शेतकरी विरोधी सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध केला. शेतकऱ्यांनी 2013 च्या नवीन भूसंपादन कायद्यांतर्गत जमीन संपादित करावी. घरे प्रथम नियमित करावीत. अशी मागणी शासनाकडे केली आहे. शासन मात्र बड्या भांडवलदारांचे तारणहार म्हणून काम करीत आहे. त्यामुळे कोणताही प्रकल्प या ठिकाणी लादू देणार नसल्याचा ठाम निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. यासाठी एमएमआरडीए विरोधी केएससी नवनगर संघर्ष समितीच्या माध्यमातून संघर्ष सुरू आहे.
भूसंपादनाला विरोध करण्यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. सभा, बैठका, पत्रके काढून त्याचे वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली.






