| खोपोली | प्रतिनिधी |
शेतीनुसार पीकपद्धतीचा अवलंब, दुभत्या जनावरांचे पालनपोषण, घरगुती कुक्कुटपालन, परसामध्ये फळबाग लागवड व मत्स्यपालन, ही पंचसूत्री प्रत्यक्षात अंमलात आणल्यास शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते, असे प्रतिपादन सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी केले.
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत वदप गावच्या हनुमान मंदिरात आयोजित जनजागरण कार्यक्रमात ते बोलत होते.
व्यासपीठावर विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, मत्स्यप्रक्रिया शास्त्रज्ञ डॉ. सनतकुमार, मत्स्यशास्त्रज्ञ डॉ.करणकुमार रामटेके, विस्तार तज्ज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर, वनस्पतीरोग तज्ज्ञ डॉ. जीवन आरेकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी हेमांगी सपकाळे, वरिष्ठ संशोधन सहायक सचिन कारले, ग्राम अधिकारी प्रवीण गवई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजित पाटील, प्रगतशील शेतकरी विनय वेखंडे, चंद्रकांत मांडे,निलिकेश दळवी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. वाघमोडे म्हणाले की, भात शेती व्यावसायिक पध्दतीने करणे आवश्यक आहे. प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याची विक्रीव्यवस्था योग्य यंत्रणेद्वारे करायला हवी. यांत्रिकीकरणाची कास धरणे आवश्यक असून, सहकारी तत्वावर यंत्रबँक तयार करून गरजेनुसार भाडेतत्त्वावर विविध यंत्रे उपलब्ध केल्यास शेतीची सर्व कामे योग्य वेळी करणे सोयीचे होईल. त्यामुळे भात पिकावरील उत्पादन खर्च कमी होण्यास व उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. कर्जत तालुक्यातील बेरोजगार व्यक्तींनी सहकारी तत्वावर मिल उभारल्यास शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा देणे सोयीचे होईल, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी महेश साळवी यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, डॉ.जीवन आरेकर यांनी भातावरील रोग व त्याचे नियंत्रण, डॉ. करणकुमार रामटेके यांनी मत्स्यपालन या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन केने यांनी केले. आभार शशिकांत गोसावी यांनी मानले. यावेळी विविध शेतकऱ्यांच्या कृषीविषयक शंकांचे निरसन करण्यात आले.
शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब करावा: डॉ. वाघमोडे
