तालुकास्तरीय कृषी मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
| पाली | प्रतिनिधी |
शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर अधिकाधिक भर देत आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनवीन उपक्रमांचा अवलंब करून प्रगतशील बनावे, असे आवाहन आ. रवींद्र पाटील यांनी केले.
सुधागड-पाली येथे आयोजित तालुकास्तरीय कृषी मेळावा आणि मार्गदर्शन कार्यक्रमात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुधागड-पाली यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समितीच्या आवारात शुक्रवारी (दि.15) कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती सभापती वैकुंठ पाटील यांच्या पुढाकारातून प्रत्येक तालुक्यात कृषी मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार हा मेळावा पार पडला.
यावेळी बोलताना आ. पाटील यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या. जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत लाभ मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित कृषी औजारांचे वाटप करण्यात आले. तसेच राबगाव येथील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना भाजीपाला कॅरेटचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला.
मेळाव्यात कृषी विभागाच्या योजनांची माहिती, प्रगतशील शेती, सेंद्रिय शेती तसेच शेतीपूरक व्यवसायांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कृषी शास्त्रज्ञ सचिन कार्ले यांनी प्रगतशील शेतीविषयी सखोल मार्गदर्शन केले, तर संस्थेचे प्रसाद दगडे यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले.
उपसभापती संदेश शेवाळे यांनी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन केले. सभापती जागृती मानकर यांनी शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि मत्स्य व्यवसाय यांसारखे शेतीपूरक उद्योग स्वीकारून आर्थिक स्तर उंचवावा, असे सांगितले.
वैकुंठ पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सेस फंड योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करत भविष्यात या निधीत मोठी वाढ करण्याचे आश्वासन दिले. मेळाव्यादरम्यान कृषी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. महिला बचत गटांची कृषी उत्पादने, कृषी सेवा केंद्रांच्या निविष्ठा तसेच सुधारित कृषी औजारांचे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरले. मान्यवरांनी विविध स्टॉलना भेट देत प्रदर्शनाचे कौतुक केले.
या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
