माकडांमुळे शेतकरी त्रस्त

बेसुमार जंगलतोडीमुळे नागरी वस्तीत प्रवेश

| श्रीवर्धन | वार्ताहर |

वानरे व माकडे यांनी श्रीवर्धन तालुक्यामध्ये बागायतदार व शेतकऱ्यांना अक्षरशः त्रस्त करून सोडले आहे. ही परिस्थिती श्रीवर्धन तालुक्यातच नाही तर संपूर्ण कोकणामध्ये आहे. बेसुमार होणारी जंगलतोड, नागरिकांचे वनजमिनीत अतिक्रमण व नैसर्गिक आपत्तीमुळे वानरांना व माकडांना जंगलामध्ये काहीही खायला उरत नसल्याने त्यांनी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे देखील वळविण्याचे पाहायला मिळत आहे.

गावात वानरांचे दहा ते पंधरा जणांचे कळप नारळी पोफळीच्या वाड्यांमध्ये घुसून खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. केळीची पिकलेली लोंगरे खाऊन टाकतात. शेवग्याच्या झाडावर शेंगा येण्याअगोदर फुले येतात, ही फुले सुद्धा वानरे खाताना पाहायला मिळतात. भात कापणी झाल्यानंतर शेतकरी शेतामध्ये वालाची पेरणी करतात व वालाचे पीक घेत असतात. परंतु वानरे व माकडे वालाची फुले देखील खाऊन या पिकाचे पूर्णपणे नुकसान करतात. माकडांवरती नियंत्रण आणण्यासाठी वनविभागाला विशेष उपाययोजना करण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून व बागायतदारां कडून करण्यात येत आहे.

निसर्ग चक्रीवादळानंतर नारळाचे पीक लवकर यावे, या उद्देशाने माझ्या बागायतीमध्ये मी टीडी जातीची लागवड केली आहे. या रोपांना नारळ लवकर येत असल्याने वानर व माकडांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. तसेच नारळाची व सुपारीची नवीन रोपे तयार केलेली असताना त्यावरील कोंब देखील हे वानरे व माकडे खात आहेत. यापुढे बागायतदारांनी बागायत करणे बंद करावे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

किरण वाकणकर, बागायतदार, मारळ
Exit mobile version