| रसायनी | प्रतिनिधी |
हातातोंडाशी आलेले भाताचे पीक पावसाने थैमान घालून नेले, असे असतानाही पावसाशी टक्कर देऊन शेतकरी भिजलेले भात पिक घेऊन झोडणी करताना दिसत आहे. रायगड हे भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. परंतु, पावसाळी हंगाम संपला तरी पाऊ पडतच होता. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्याचबरोबर महापूर, शेतात पाणी व बांध बंदिस्ती वाहून गेली, तरीही शेतकऱ्यांनी आपल्या भात शेतात भात पिकवले. भात पिक तयार झाले तरीही पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. दिवाळी नंतर शेतकरी आकाशाकडे बघून कापणी करीत होता. कारण पाऊस साठवलेली भात शेतीची मळणीदेखील करून देत नव्हता. आता आकाशाकडे पाहत पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी झोडणी करत आहे. तसेच, एका बाजूला झोडणी तर दुसऱ्या बाजूला मळणी करून काढलेले भिजलेले भात सुकवण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. यावेळीदेखील तो आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.







