कालव्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
| माणगाव | प्रतिनिधी |
काळ प्रकल्पांतर्ग डोलवहाळ बंधाऱ्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षी 15 डिसेंबरदरम्यान सोडले जाते. मात्र, अर्धा डिसेंबर महिना संपला तरी या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने अद्यापही हाती घेतली नाहीत. दरवर्षीप्रमाणे यंदाही अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात या कालव्याला मोठ्या प्रमाणात माती, दगड, गाळ त्याचबरोबर शेवाळ व झाडे, झुडपे वाढली आहेत. त्यामुळे रब्बी हंगामातील पीक घेणारे शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी मशागतीची कामे हाती घेतली आहेत; परंतु, पाटबंधारे विभागाला मात्र कालवा सफाई व दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त अद्याप मिळाला नसल्याने शेतकरी कमालीचा अस्वस्थ झाला आहे.
माणगाव तालुक्यातील शेतकरी चांगलाच रब्बी हंगामाच्या मशागतीच्या कामाला लागला असून, रब्बी हंगामातील पीक घेण्यासाठी आपल्या शेताची मशागतीची कामे करण्यात मग्न झाला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पंधरा डिसेंबरला कालव्याला पाणी सोडले जाते. परंतु, ही डेडलाईन झाली तरी कालवा सफाईची कामे हाती घेतलेली नाही. ती कधी सुरु होणार, हा प्रश्नच शेतकऱ्यांपुढे उभा आहे. यांत्रिक विभागाकडून मशनरी उपलब्ध झाल्यानंतर कालव्याच्या सफाईचे काम जलद गतीने सुरु केले जाईल, अशी माहिती माणगाव पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी श्रीकांत महामुनी यांनी प्रतीनिधींशी बोलताना दिली.
माणगाव तालुक्यातील अनेक शेतकरी भातपीक मोठ्या प्रमाणात घेतात व उर्वरित शेतकरी कडधान्यांची पिके घेतात. कडधान्य पेरलेल्या शेतात पाणी गेल्यानंतर नुकसान होते. त्यामुळे कडधान्य पिकवणारे शेतकरी पाणी सोडण्यास नकार देतात. तर भातपीक घेणारे शेतकरी पाण्याची मागणी करतात. त्यामुळे पाणी सोडण्याबाबत यंदाचे वर्षीही पेच पाटबंधारे विभागापुढे उभारणार आहे. सन 2018 मध्ये चार हजार 953 हेक्टर सिंचनापैकी भातशेती, फळबागा व कलिंगडे, भाजीपाला यासाठी 1248 हेक्टर सिंचन झाले होते. यंदाचे वर्षी माणगाव शाखेवर 79.32 हेक्टर जमिनीवर, तर मोर्बा शाखा 61.23 हेक्टर जमिनीवर सिंचन करण्यात आले होते. गोरेगाव शाखा कालवा गेल्या वर्षी लिकेजमुळे बंद होता. धरणाचीवाडी ते माणगाव हे 30 कि.मी अंतर आहे.
असे होते पाण्याचे वाटप
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ येथे बंधारा बांधण्यात आला आहे. 1974मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. 1976 पासून प्रत्यक्ष सिंचन सुरु झाले. त्यानुसार बंधाऱ्यातील पाण्याची विभागणी करण्यात आली. औद्योगिक वापरासाठी सत्तेचाळीस 47 दशलक्ष घनमीटर, पिण्यासाठी 7.65, सिंचनासाठी 156.42 दशलक्ष घनमीटर इतकी तरतूद करण्यात आली आहे. भिरा येथील टाटा जलविधुत केंद्रातून वीजनिर्मितीनंतर वर्षाकाठी उपलब्ध होणाऱ्या 664694 दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी एकशे तीन दशलक्ष घनमीटर पाण्याचा सिंचनासाठी वापर होतो.
कालव्याची कामे शासनाने वेळीच हाती घेऊन माणगाव तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आल्यास तालुका सुजलाम् सुफलाम् होईल. परिणामी, माणगावच्या आर्थिक उत्पन्नाचा स्तर उंचावेल.
राहुल दसवते, शेतकरी आडघर