शहापूर ग्रामस्थांचा निर्धार, फुटलेल्या बांधात उभे राहून सत्याग्रह
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तालुक्यातील शहापूर येथील पूर्व बाजूस झालेली बांध फुटी पूर्णत्वास जाण्यासाठी पोहोच रस्ता एमआयडीसीने किंवा खारभूमी खात्याने न बनवल्याने निषेध म्हणून 26 जानेवारी 2022 रोजी फुटलेल्या बांधात वाहत्या पाण्यात दिवसभर उभे राहून सत्याग्रह करणार असल्याचा इशारा श्रमिक मुक्ती दलाने शासनाला दिला आहे.
25 जुलै 2021 रोजी एमआयडीसी संपादनातील शहापूर -धेरंड ता. अलिबाग येथील बांधास खांड गेली. फोटो सहित तहसीलदार अलिबाग, उपविभागीय अधिकरी अलिबाग, कार्यकारी अभियंता एमआयडीसी ,कार्यकारी अभियंता खारभूमी ,व जिल्हाधिकारी रायगड याना लेखी कळवले आहे. फुटलेला बांध पूर्णत्वास जाण्यासाठी उसनी माती नेल्याशिवाय तो बांधला जाऊ शकत नाही म्हणून त्या बांधापर्यंत मुख रस्ता ते खारबांध पर्यंत पोहोच रस्ता करायचे ठरले .त्याची कार्यवाही करण्यासाठी दिनक 30 नोव्हे 2021 रोजी तहसीलदार अलिबाग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली सदर बैठकीत सदर पोहोच रस्त्याचे सर्वेक्षण गट विकास अधिकरी पंचायत समिती अलिबाग व उप अभियंता खारभूमी व सोबत उप अभियंता बांधकाम विभाग यांच्या सयुक्त पहाणीतून करायचे ठरले. त्याचे लेखी आदेश दि. 6 डिसेंबर 2021 रोजी सबंधीतास लेखी पत्राने दिले . तद नंतर याच विषयावर उपविभागीय अधिकारी अलिबाग, कार्यकारी अभियंता एमआयडीसी व खारभूमी यांनी प्रत्यक्ष बांध फुटीची पहाणी केली . व तातडीने पोहोच रस्ता करण्याचे निर्देश दिले. परंतु प्रत्येक उधाणाला घरापर्यंत पाणी येण्याचे थांबत नाही .
यापूर्वी देखील घरापर्यंत पाणी आलेले आहे व येत आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर सर्व प्रथम पोहोच रस्ता करावा लागेल. हि बाब आम्ही गेली 3 वर्ष प्रशासनास सांगत आहोत.6 कोटी रुपयाचे पेझारी धेरंड रस्त्याचे एस्टीमेट बनवणार्या एमआयडीसीला 2 किमी पोहोच रस्त्याचे एस्टिमेट बनवता येत नाही हि थाप मारू नये. आणि एस्टिमेट बनवता येत नसेल तर त्यांनी लेखी जाहीर करून आमच्या कडे शिकवणी लावावी , रोजगार हमी योजनेतून हे काम मंजूर आहे ,आम्ही मजूर म्हणून काम करण्यास तयार आहोत. पण कोणतीही कार्यवाही होत नाही म्हणून आम्हाला सत्याग्रह करण्यावाचून पर्याय उरला नाही .
आम्ही बाधित महिला व पुरुष, मुले,मुली ,वृद्ध दि. 26 जाने 2022 रोजी जिथे बांध फुटलेला आहे तेथे वाहत्या पाण्यात उतरून पूर्ण दिवस पाण्यात उभे राहून प्रशासनाचा निषेध करणार आहोत. सत्याग्रह असल्याने आम्हास परवानगी घेण्याची गरज नाही,असे नमूद करत जिथे आंदोलन करणार आहेत त्या फुटलेल्या बांधाचा फोटोही निवेदन सोबत जोडला आहे.