पाटबंधारे खात्याला देणार निवेदन
| खांब | प्रतिनिधी |
गेली अनेक वर्षे कुंडलिकेच्या सिंचनातून कोलाड पाटबंधारे विभागाच्या वतीने उजवातीर डावेतीर कालवे दुरुस्तीच्या नावाखाली अद्याप रडकथेत आहेत. त्यामुळे गेली दहा वर्ष खांब धामणसई परिसरातील उजवातीर तर आंबेवाडी, निवीचा डावातीर या कालव्यांना पाणी येत नसल्याने उन्हाळी भातशेती भिजत नाहीत. अनेक वर्ष शेतकरी ग्रामस्थ प्रामुख्याने पाण्याची मागणी करतात. मात्र त्याकडे बंधारे खाते दुर्लक्ष करत कानाडोळा करत आहेत. त्यामुळे आता तालुक्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. सर्वत्र गावोगावी बैठकी सुरू झाल्या असून यासाठी लवकरच याबाबत पाठ बंधारे खात्याला निवेदन देण्यासाठी सक्रिय भूमिकेत आहेत.
शेतीच्या पाण्यासाठी खांब देवकान्हे धामणसई विभागातील शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. डोळवहाल सिंचनातून उजवा तिर कालव्याला येत्या डिसेंबरपर्यंत पाणी द्या, सबब ऐकली जाणार नाही. तसेच नोव्हेंबर अखेरपर्यंत कालव्याची उर्वरित दुरुस्ती तसेच गाळ काढण्यात यावा, याबाबत कोलाड पाठबंधारे खात्याला ईशारा देत उपभियंता यांना धामणसई पिंगलसई भागातील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. त्या पाठोपाठ खांब परिसरातील तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे येथील सर्व शेतकरी एकत्रित येत पाण्याच्या मागणीसाठी निवेदन देणार आहेत.
केंद्र सरकारने जारी केलेल्या वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र इको सिन्स्विटी झोन हटाव या विरोधात येथील शेतकरी संघटनात्मक एकत्रित येऊन काम करत आहेत. दुबार भातपीक घेण्यासाठी कालव्याला पाणीपुरवठा करावा. यासाठी खांब विभागातील तळवली, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे येथील शेतकरी कालव्याला पाणी घेण्यासाठी आग्रही आहेत. याबाबत धानकान्हे येथे येथील शेतकऱ्यांची सभा नुकतीच पार पडली. यात सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. यावेळी या भागातील बहुसंख्येने शेतकरी तसेच शेतकरी आदिवासी बांधव उपस्थित होते.
पाणी देण्यास पाठबंधारे खात्याची नकारात्मक भूमिका
रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे धामणसई या विभागातील शेतकऱ्यांना कालवा दुरुस्तीच्या नावाखाली डोळवहाल सिंचनातून कोलाड पाटबंधारे विभाग गेली अनेक वर्ष पाणी देत नाही. तसेच त्याची दुरुस्ती ही केली आहे. मात्र येथील शेतकऱ्यांना पाणी देण्यास पाठबंधारे खात्याची नकारात्मक भूमिका असल्याने या अनुषंगाने शेतकरी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.







