| सुतारवाडी | प्रतिनिधी |
31 डिसेंबरला बुधवार आहे. त्यामुळे विविध परिसरातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सुतारवाडी परिसरात मोठी गर्दी करणार आहेत. थर्टी फर्स्टच्या दिवशी बुधवार असल्यामुळे दारू पिणाऱ्यांची मोठी चंगळ होणार आहे. हजारो कोंबड्या कोंबडे, बकरे यांची कत्तल होणार आहे. यावर्षी पाऊस जवळजवळ सहा महिने सातत्याने पडत होता. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून वालाच्या शेंगांचा बहर उशिराने येणार आहे. त्यामुळे थर्टी फर्स्ट च्या दिवशी पोपटीची चव फार थोड्या प्रमाणावर जगायला मिळणार आहे. गावठी कोंबडा कोंबडीला मोठ्या प्रमाणावर मागणी असून कोंबडीची किंमत रू. 400 ते 500 तसेच कोंबड्याची किंमत रू. 800 आणि त्यापुढे आहे. गावठी कोंबडा कोंबडीच्या शोधामध्ये अनेक जण आताच फिरू लागले आहेत. सुतारवाडी, धगडवाडी, कुडली, केरळ, कामत या परिसरामध्ये अनेक सुसज्ज असे फार्म हाऊस आहेत. या ठिकाणी बुकिंग सुरू झाल्याचे समजते. सुतारवाडी येथे सुसज्ज धरण आहे. दरवर्षी अनेक दारू पिणारे या ठिकाणी एकत्र येतात, तेथील सुंदर परिसर अस्वच्छ करतात. बाटल्या खाद्यपदार्थ अस्तव्यस्त फेकून देतात. बाटल्या फोडून पाण्यातही टाकल्या जातात. असे झाले तर कौटुंबिक पर्यटकांना याचा त्रास होत असतो. मावळत्या वर्षाला निरोप देताना, आणि नूतन वर्षाचे स्वागत करताना कोणाला त्याचा त्रास होऊ नये, कोठेही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेणे जरुरीचे आहे. ज्या ज्या ठिकाणी फार्म हाऊस आहेत त्यांनी सुद्धा आलेल्या पर्यटकांना, दारू पिणाऱ्यांना योग्य ती समज देणे आवश्यक आहे.







