धरणाच्या पाण्यावर बहरली शेती

उन्हाळी भाजीपाला पिकवून शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील वावेहवेली येथील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात कारली, भेंडी, मिरचीचे मळे फुलवले आहेत. वावे धरणाच्या पाझर तलावाच्या पाण्याच्या जोरावर गावातील तरुण शेतकरी बांधवांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेती केली आहे. त्याचबरोबर शासकीय कृषी अधिकार्‍यांच्या मदतीने वेगवेगळ्या वाणांची निवड केलेली शेती आता बहरली असून, शेतकर्‍यांची मेहनत फळाला आल्याचे चित्र आहे.

या गावातील स्त्रिया, पुरुष मेहनती असून, फळभाज्या, पालेभाज्या विक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी धडपड करीत असतात. त्यामधून वर्षभरासाठी लागणारा पैसा यातून नक्कीच मिळवित असतात. वावे हवेलीला लाभलेल्या धरणामुळे येथील शेतकर्‍यांचे जीवन समृद्ध झाले आहे. तालुक्यात कोणतेही कारखाने अथवा कंपन्या नसल्याने बहुतांश तरुणांनी शहराकडे नोकरीनिमित्त स्थलांतर केले आहे. मात्र, वावेहवेली येथील तरुणांनी धरणाच्या पाण्याचा पुरेपूर वापर करून शेतीतून रोजगारनिर्मिती केली आहे. उन्हाळी हंगामातदेखील धरणाच्या पाण्यावर मेथी, पालक, माठ, शेपू, काकडी, कोथिंबीर, मिरची यांसारखी अनेक भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. ही पिके शेतकरी बांधवांना आर्थिक प्रगतीकडे नेणारी ठरत आहेत. अशी मेहनत करणारी शेतकरी पिढी दुसर्‍या पिढीलाही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नाविन्यपूर्ण शेती करण्यात नक्कीच नवी दिशा देतील, यात शंका नाही.

वावे धरणाच्या पाण्यावर शेतीत वेगवेगळ्या प्रकारच्या वाणांचे बाजारोपण करीत कृषी अधिकार्‍यांच्या सल्ल्याने कीटकनाशक फवारणी, खते देऊन विविध भाज्यांची पिके घेत असतो व यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो.

गजानन पारावे, शेतकरी

उन्हाळी भाजीपाला लागवड करून त्यामध्ये भेंडी, वांगी, मिरची, टोमॅटो अशी पिके घेऊन तळा बाजारपेठेत याची विक्री होते. माठ, मुळा, मिरची, कोथिंबीर, काकडी ही पिके अगदी थोड्या दिवसात अधिक उत्पन्न देणारी असतात. यातून पैसाही हातात खेळता राहतो.

राजश्री साळवी, महिला शेतकरी
Exit mobile version