| हैदराबाद | वृत्तसंस्था |
रवी शास्त्री यांच्यासह माजी यष्टिरक्षक फारुख इंजिनियर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एका खास सोहळ्यात ‘बीसीसीआय’कडून 2019-20 पासूनच्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.
भारताच्या 1983 मधील विश्वविजयी संघाचे शास्त्री सदस्य होते. त्यानंतर 1985 मधील जागतिक बेन्सन अँड हेजेस मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शास्त्री यांची निवड झाली होती. ऑस्ट्रेलियात लागोपाठ दोन मालिका विजयाचे शास्त्री प्रशिक्षक या नात्याने मुख्य सुत्रधार होते. पुरस्कार सोहळ्यात शास्त्री आणि इंजिनियर यांचा सन्मान सर्वात लक्षवेधी ठरला.
“माझ्यासाठी हा खूप भावनात्मक प्रसंग आहे. चार दशकांहून अधिक काळ भारतीय क्रिकेटशी जोडल्या गेल्याचा हा सन्मान आहे. वयाच्या 17व्या वर्षी मी क्रिकेटची सुरुवात केली आणि वयाच्या तिशीत माझे क्रिकेट थांबले होते. त्यानंतरही ‘बीसीसीआय’ने माझी साथ सोडली नाही. त्यांनी मला खर्या अर्थाने खेळाचा मार्ग दाखवला. फारुख यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी, या खेळात फार पैसा नव्हता. पण, देशासाठी खेळण्याचा अभिमान होता,’’ असे शास्त्री म्हणाले.
या सोहळ्यात शुभमन गिलला 2022-23साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून पॉली उम्रीगर पदकाने गौरविण्यात आले. याच वर्षासाठी यशस्वी जैस्वालला सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी सन्मानित करण्यात आले. महिला विभागात फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माला आंतंरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. दीप्तीला हा पुरस्कार 2019-20, 2022-23 असा दोन वर्षांसाठी मिळाला. त्याचवेळी 2020-21 आणि 2021-22साठी हा पुरस्कार महिला विभागात स्मृती मनधानाला मिळाला.