| महाड | प्रतिनिधी |
महाड शहराला ऐतिहासिक आणि औद्योगिक महत्त्व असतानाही रेल्वे जंक्शन नसल्याने होणारी गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष पराग वडके यांनी बुधवारी (दि.29) महाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात वडके यांनी महाडच्या रेल्वे जंक्शनच्या मागणीवर प्रकाश टाकला आहे.
महाड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केलेले चवदार तळे याच शहरात असल्याने ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महाडला जर रेल्वे जंक्शन मिळाले तर येथील पर्यटनाला चालना मिळेल, औद्योगिक वसाहतीतील मालवाहतूक सुलभ होईल, मुंबईत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास सोपा होईल आणि महाडसह पंचक्रोशीतील जनतेला मुंबईकडे ये-जा करणे अधिक सुलभ होईल, असे त्यांनी बोलताना सांगितले. तसेच, दरवर्षी पावसाळ्यात सावित्री नदीच्या पुराने महाडमध्ये होणारे नुकसान लक्षात घेऊन, वडके यांनी कोकण रेल्वेच्या पुलामुळे पाणी अडकून राहत असल्याचे निदर्शनास आणले. त्यावर उपाय म्हणून हा पूल हलवून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत रेल्वे पटरी तयार करून महाड शहर व महाड एमआयडीसी दरम्यान रेल्वे जंक्शन उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष संदीप सकपाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
रेल्वे जंक्शनसाठी आमरण उपोषण
