। महाड । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील आमशेत ग्रामपंचायत हद्दीतील राहते घर तोडल्याप्रकरणी बेलदार समाजाच्या नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भर पावसात आमरण उपोषण चालू केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अशोक हरिभाऊ पवार हे बेलदार व भटक्या समाजाचे असून महाड तालुक्यातील अमशेत गावात त्यांनी घर बांधलेले होते. हे घर बेकायदेशीर असल्याचे ठरवून ग्रामपंचायत व जागा मालकाने पोलीस व प्रशासनाला हाताशी धरून त्यांचे राहते घर तोडल्याचा आरोप अशोक हरिभाऊ पवार यांनी केला आहे. महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी अशोक हरिभाऊ पवार व त्यांच्या कुटुंबियांना अटक करण्याची याबाबत धमकी दिल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
तसेच, जीवन माने यांची तातडीने बदली करावी व राहते घर तोडल्या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी अशोक पवार व त्यांच्या कुटुंबीयांनी केली असून महाड मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी सकाळपासून आमरण उपोषण चालू केले आहे. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रायगड जिल्हाधिकारी, महाडचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे.