। कोलाड । वार्ताहर ।
अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सोमवारी (दि.23) संध्याकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यामुळे भातशेतीत पाणीच पाणी झाल्याने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस गायब झाला होता. यामुळे भातशेती करपू लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, कोलाड परिसरात सोमवारी संध्याकाळपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. यामुळे भातशेतीला नवसंजीवनी मिळाली असून शेतकरी राजा सुखावला आहे. तसेच, यावर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून जुन महिन्याच्या सुरुवातीला पहिल्याच आठवड्यापासून चांगली सुरुवात झाली. यामुळे भात पेरणीची कामेदेखील वेळेवर सुरु झाली. जुन महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाची रिपरिप सतत सुरु असल्यामुळे भाताची रोपे उत्तम प्रकारे तयार झाली आहेत.
जुलै महिन्यात पावसाने अति जोरदार सुरुवात केल्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीला भात लावणीची सुरुवात झाली. पावसाची संततधार सतत सुरु राहिल्याने जुलै महिन्यात पंधरा ते विस दिवसात लावणी पूर्ण झाली.परंतु, लावणी पूर्ण झाल्यानंतर अतिजोरदार पावसामुळे सर्व भातशेती तीन-चार दिवस पुराच्या पाण्यामुळे पूर्ण पणे पाण्याखाली गेली होती. काही भातशेती तर वाहून गेली होती. यानंतर भातशेतीने परत उभारी घेतली. भात फुलं घेत असतांना गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्यामुळे शेतात पाणी अभावी जमीन भेगाळल्यामुळे भातशेती धोक्यात आली होती. परंतु, सोमवारी जोरदार पडलेल्या पावसामुळे भातशेती आता बहरेल, अशी अशा शेतकरी वर्गाला वाटू लागली आहे.