| महाड | प्रतिनिधी |
महाड शहराचे ऐतिहासिक, सामाजिक, पर्यटन आणि औद्योगिक महत्त्व लक्षात घेता, कोकण रेल्वेचा मार्ग महाड शहरातून नेण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. सध्या रेल्वेमार्ग शहरापासून जवळपास 15 किमी अंतरावरून गेला आहे. या मागणीचा ठोस पाठपुरावा करण्याची ग्वाही भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिली आहे. महाड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) चे शहराध्यक्ष पराग वडके यांनी या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यानंतर तहसिलदार महेश शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वे अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांची समन्वय बैठक झाली. या बैठकीस खासदार म्हात्रे उपस्थित होते. या बैठकीस रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. जर प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापकांना यायला वेळ नव्हता, तर आम्हीच रत्नागिरीला गेलो असतो असेही ते म्हणाले. पुढे बोलताना खासदार म्हात्रे यांनी सांगितले की, कोकण रेल्वेचा मूळ प्रस्तावित मार्ग वीर-गांधारपाले-महाड-महाबळेश्वर असा होता, मात्र तो वळसा घेऊन रोह्यातून नेण्यात आला. स्थानिक आमदार-खासदारांच्या निष्क्रियतेमुळे हे घडले, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. या मार्गाबाबतचा प्रस्ताव आता मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचे सांगत, तो मंजूर होण्यासाठी आपण केंद्रीय रेल्वे मंत्रालयात ठोस पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.







