रायगड जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील प्रास्तवित शिलार येथील धरणाला त्या भागातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. धरण होणार असलेल्या भागातील तीन ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी ग्रामसभेत धरणविरोधी ठराव घेऊन धरणाला विरोध केला आहे. या धरणाच्या विरोधातील ठराव रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले असून, शासनाने धरण बंधू नये, अशी मागणी त्या निवेदनात केली आहे.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून शिलार धरण उभारले जाणार आहे. या धरणाला त्या धरण क्षेत्रातील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्या भागातील बाधित गावातील शेतकऱ्यांनी आपल्या भावना ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत मोकळ्या केल्या आहेत. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांनी 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत घरे, शाळा, देवस्थाने, स्मशानभूमी, दफनभूमी, झाडे, नदी, नाले व डोंगरावरच्या टेकड्या अशा अनेक सजीव निर्जीव वास्तू त्याच्या प्रत्यक्षात साक्षीदार आहेत. त्यामुळे या भूभागाशी आमचे ग्रामस्थांचे भावनिक अतूट नाते आहे. तेव्हा आम्हाला आमच्या या मायभूमी, जन्मभूमी व कर्मभूमीपासून दूर करून विस्थापित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तो निर्णय शासनाने त्वरित रद्द कराव, असा ठराव ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला आहे. मोग्रज ग्रामपंचायतमधील ग्रामस्थांनी देखील ग्रामसभा आयोजित करून पिंगलास आणि खानंद गावातील ग्रामस्थांनी त्या भागात असलेली शेती लक्षात घेऊन धरणाला विरोध केला आहे. त्यामुळे या तिन्ही ग्रामपंचायतीचे ठराव स्थानिक शेतकरी दिनेश रसाळ यांच्या माध्यमातून रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांना अलिबाग देऊन धरण रद्द करावे, अशी मागणी केली आहे.






