। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत विरोधात रायगड जिल्हा परिषद समोर जानेवारीमध्ये उपोषण करण्यात आले होते. यावेळी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांसमोर दिलेले लेखी आश्वासन पाळले गेले नसल्याने धामोते गावातील संजय विरले यांनी पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, हे उपोषण 8 ऑक्टोबर रोजी नेरळ-कळंब राज्यमार्गावरील साईबाबा चौकात होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
ग्रुप ग्रामपंचायत कोल्हारे येथील धामोते गावातील खुल्या जागेत अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली आहेत. यामुळे ग्रामस्थ संजय विरले यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद झाला होता. म्हणून संजय विरले यांनी जानेवारी महिन्यात कर्जत येथे उपोषण केले होते. यावेळी कर्जत पंचायत समितीने आठ दिवसात रस्ता खुला करून देण्याची कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याने विरले यांनी रायगड जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू केले. उपोषणाच्या तिसर्या दिवशी जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढाकार घेतला. यावेळी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी कार्यकारी अधिकारी यांना रस्ता खुला करून आणि पक्का रस्ता तयार करून दिला जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र, मागील नऊ महिन्यात धामोते येथील खुल्या गावठाण जागेची खरेदी करून त्या जागेत त्यांनी बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु, संजय विरले यांच्या घराकडे जाणारा रस्ता काही तयार झालेला नाही. उपोषण केल्यावर प्रत्येक वेळी उपोषण मागे घेण्यासाठी गटविकास अधिकारी तसेच सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मला रस्ता मोकळा करून देणेबाबत पत्रकाद्वारे आश्वासने देऊन माझी फसवणूक केली आहे. म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाची सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने पायमल्ली केली आहे. सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी उपोषण करण्याचा निर्णय संजय विरले यांनी घेतला आहे.