जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थांचा हक्कासाठी लढा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
सर्वत्र नव वर्षाचं जल्लोषात स्वागत होत असतानाच प्रकल्पग्रस्त मात्र प्रलंबित मागण्यांसाठी तसेच न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले असल्याचं चित्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी (दि.1) दिसून आलं. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेविरोधात पिडीत महिला व रिलायन्य कंपनीने केलेल्या अन्यायाविरोधात प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले होते.
पोयनाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाशिवरे दुरक्षेत्रातील पोलीस हवालदार अमोल घरत यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी पिडीत महिलेने आवाज उठविला आहे. पोलिसांच्या या भूमिकेविरोधात महिलेने व तिच्या पतीने उपोषण सुरू केले आहे. पोलीस हवालदार अमोल घरत असे या पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. ते हाशिवरे येथील पोलीस दुरक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. 13 ऑक्टोबर 2023 रोजी पिडीत महिला त्यांच्या घराबाहेर सुकलेले कपडे काढत होत्या. त्यावेळी आरोपींनी विनयभंग करण्याबरोबरच तिला मारहाण केली. याप्रकरणी हाशिवरे येथील पोलीस दुरक्षेत्रामध्ये जाऊन पिडीत महिलेने तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल केली. परंतु काही आरोपींविरोधात त्यांनी तक्रार घेतली नाही. याबाबत महिलेने अनेकवेळा पोलीस हवालदार घरत यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे. आपल्या न्याय हक्कासाठी पोलीस ठाण्याचा उंबरडा झिजवला. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी अखेर अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. पिडीत महिलेसोबत त्यांचे पतीदेखील उपोषणाला बसले आहेत.
रुग्णालयात उपचारादरम्यान दिलेल्या जबाबात महिलेने एकच आरोपीचे नाव सांगितले होते. त्यानंतर आपसात विषय मिटविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले होते. परंतु तो प्रश्न सुटला नसल्याने त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन अन्य आरोपींविरोधात तक्रार करण्याची मागणी केली आहे. तपासात त्यांचा काहीही संबंध नसल्याचे दिसून आले आहे. तसेच याप्रकरणात पोलीस हवालदार घरत यांचा काहीही संबंध नाही.
संतोष दराडे-
सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोयनाड
रिलायन्सविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक
रोहा तालुक्यातील नागोठणे येथील आयपीसीएल, रिलायन्स कंपनीसाठी परिसरातील असंख्य शेतकर्यांनी जमीनी दिल्या. परंतु अनेक प्रकल्पग्रस्त कायम नोकरीपासून वंचित आहेत. कायम नोकरी मिळावी, यासाठी अनेक वेळा जिल्हा प्रशासनाकडे बैठका झाल्या. फक्त प्रशासनाकडून आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. प्रकल्पग्रस्तांची न्यायाची निर्णायक संयुक्त बैठक गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. ही बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली. परंतु त्याबाबत दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. पुष्पा भोईर, दत्तात्रेय कुथे, रोशन जांबेकर, सुमीत शिर्के योगेश पाटील यांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राकेश जवके, संजय कुथे, सुरेश कोकाटे, मनोहर माळी, स्मिता दाभाडे आदींसह असंख्य महिला, ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्त व तरुणांनी सहभाग घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष गंगाराम मिनमीने यांच्या नेतृत्वाखाली हा लढा पुकारण्यात आला आहे.