दोन अल्पवयीन मुलांसह दोघांना घेतले ताब्यात
| पनवेल | प्रतिनिधी |
कळंबोली सेक्टर-8 मधील चर्चसमोर झोपलेल्या व्यक्तीवर चौघा तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी मारेकर्यांचा शोध घेऊन प्राणघातक हल्ला करणार्या अल्पवयीन मुलासह दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आता फरार असलेल्या इतर दोघांचा शोध सुरु केला आहे. या घटनेतील जखमी व आरोपी हे सर्वजण नशा करणारे आहेत.
या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव संतोष फुलपगारे (40) असे असून, तो फिरस्ता आहे. तो कळंबोली सेक्टर-8 मधील सेंट सॅबेस्टीयन चर्च समोरील भागात झोपला होता. त्यावेळी पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या चौघा आरोपींपैकी दीपक वसू याने संतोष फुलपगारे याला पाहून नशा करुन चर्चच्या समोर झोपतात असे बोलून संतोषच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी जखमी संतोषने आरडाओरड केल्यानंतर सदर आरोपींनी जखमी संतोषला मारहाणीबाबत कुणाला काहीही न सांगण्याबाबत धमकावून त्याठिकाणावरुन पळ काढला.
या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी झाल्याने त्या भागातील नागरीकांनी त्याला एमएमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौघा मारेकर्यांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढून त्यापैकी दीपक चौव्हाण व त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आता फरार असलेल्या इतर दोघांचा शोध सुरु केला आहे.