। सांगली । प्रतिनिधी ।
सांगलीतील जामवाडी येथे एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. भररस्त्यात चार जणांनी तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
सांगलीतील जामवाडी परिसरातील अनिकेत तुकाराम हिप्परकर (22) हा कबड्डीपटू असून तो यापूर्वी जिल्हा संघातून कब्बडी खेळला होता. हिप्परकर याचा काही दिवसांपासून कब्बडी खेळणाऱ्या त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता. या वादातून नेहमी त्यांच्यात खटके उडत होते. मंगळवारी (दि. 27) नेहमीप्रमाणे अनिकेत हा व्यायामाला जाण्यासाठी घरातून निघाला. जामवाडी येथील मरगुबाई मंदिरासमोर त्याला चार हल्लेखोरांनी गाठले. त्यांनी त्याच्या मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात तो जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर चारही हल्लेखोर तेथून फरार झाले.
खुनाची माहिती मिळताच शहर पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, सदरचा खून हा चार दिवसांपूर्वी झालेल्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तसेच, चौघा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी शहर आणि एलसीबीची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.