तरुणांकडून एकावर जीवघेणा हल्ला

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील कडाव गावातील तरुणावर कडाव गावातील नाक्यावर पाच चेहरेबंद तरूणांकडून जीवघेणा हल्ला झाला असल्याची घटना घडली. फोन करून रतिश पवार या तरुणास बोलावून घेतले आणि हल्ला करण्यात आला. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव हे रतिश पवार असे आहे.

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कडाव येथील तरूण रतिश पवार याला आलेल्या फोननुसार कडाव येथील नाक्यावर बोलावल्याप्रमाणे तो त्याठिकाणी आला होता. मात्र, तेथे आल्यावर काहीही समजण्याआधी त्याच्यावर त्या चेहरेबंद पाच तरुणांनी हल्ला केला. 5 डिसेंबर रोजी दुपारचे अंदाजे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास आड बाजूस नेऊन फावडा आणि टिकाव यांचे दांडके वापरून जीवघेणा हल्ला करून घटनास्थळावरून त्या तरूणांनी पळ काढला. तर, या पळ काढलेल्या चेहरेबंद तरुणांपैकी तीन तरूण हेे बाहेर गावातील, तर दोन हे कडाव गावातील असल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रतिश पवार याला उपचारासाठी स्थानिक तरूणांनी त्याला कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता, गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रूग्णालयात दाखल केले आहे.

हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचे बोलले जात असून, रतिश पवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समजते. हा हल्ला वैयक्तिक की राजकीय वादातून झाला आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत असून, तशी दबक्या आवाजात चर्चादेखील सुरू आहे. रतिश पवारवर झालेल्या जिवघेण्या हल्ल्याने कडाव गावातील वातावरण सध्या तापले असून, याप्रकरणी कर्जत पोलीस तपास करीत आहेत.

Exit mobile version