बेलापूरजवळ कारचा भीषण अपघात; राष्ट्रवादी नेत्याच्या नातवाचे निधन

। बेलापूर । वार्ताहर ।

एनआरआय वसाहतीकडून पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरून बेलापूरच्या दिशने जाणारी भरधाव होंडा सिटी कार रेल्वे पुलाच्या कठड्याला धडकल्याने कार चालक साहिल वानखेडकर (28) याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे एनआरआय वसाहतीजवळ घडली.

साहिल वानखेडकर हा माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते सीताराम घनदाट यांचा नातू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहिल वानखेडकर सानपाडा येथे वास्तव्यास होता. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास तो कारने एनआरआय वसाहतीतून पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडने बेलापूरच्या दिशेने जात असताना झालेल्या अपघातात तो कारबाहेर फेकला गेला व गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर कारने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवली. साहिल वानखेडकर इतक्या पहाटे कुठून कुठे चालला होता, याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली नसल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी सांगितले.

Exit mobile version