। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल परिसरात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती राजीव कुट्टीपन पी.व्ही. (54) रा.नवीन पनवेल हा आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार घेऊन एअरपोर्ट सर्व्हिस रोडवरून जात होता. दरम्यान, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरील डिव्हायडरला जोरदार धडकली. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर पलटी झाली. अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली असून, त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसले तरी भरधाव वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे हे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.







