। पुणे । प्रतिनिधी ।
पुण्यातील सिंहगड घाटात ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घाटात कोसळली. या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, दैव बलवत्तर म्हणून या मोठ्या अपघातात चालकाचा जीव वाचला आहे. दरम्यान पर्यटकांसाठी हा घाट मार्ग आता असुरक्षित झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या सिंहगड घाटातुन सर्वात धोकादायक वळणावरुन रविवारी (दि. 12) दुपारच्या सुमारास मालवाहक ट्रक जात होता. या ट्रकच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने मालवाहतूक करणारा आयशर ट्रक येथील ११ हजार पॉइंट वरून खोल दरीत कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेनंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघात झालेल्या ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने या दुर्घटनेत चालक बचावला असून, मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाली आहे. पोलिसांना नागरिकांच्या मदतीने ट्रक दरीतून बाहेर काढण्यात यश आलं आहे. अपघातग्रस्त ट्रक चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान सिंहगड घाट वर्दळीचा आहे. इथे पर्यटकांची नेहमी गर्दी असते. सिंहगड घाटातुन क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून सिंहगड घाटरस्ता वापरण्याची शक्कल लढवली जाऊ लागल्याने पर्यटकांसाठी हा घाट मार्ग आता असुरक्षित ठरू लागला आहे.







