पुण्यातील नवले पुलाजवळ ट्रकचा भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू

दोघे जण गंभीर जखमी

| पुणे | वृत्तसंस्था |

पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाला. कंटेनरची धडक झाल्याने ट्रकने पेट घेतला आणि त्याला आग लागली. या आगीत ट्रकच्या केबीनमध्ये बसून प्रवास करणारे चारजण होरपळून मृत्यूमुखी पडले. तर, इतर जखमी झाले. ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

पुण्यातील नवले पुलावर अपघाताचे सत्र सुरू असून पुन्हा एकदा जीवघेणा अपघात झाला आहे. हा अपघात न-हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ रात्री नऊच्या सुमारास घडला. मक्याचा भुसा घेऊन साता-याकडून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक न-हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला. त्यावेळी ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणा-या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कंटेनर रस्त्यावरच उलटला. मात्र, धडक मोठी बसल्याने ट्रकला क्षणातच आग लागली. यात ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, दोन गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली. या पुलाची रचना चुकीची असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. 2014 पासून दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या साडेतीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 186 अपघात झाले. या अपघातांमध्ये आतापर्यंत 70हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 145 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Exit mobile version