वडील व बहिणीचे स्वप्न केले साकार

शरीरसौष्ठवपटू अक्षयने पटकावले सुवर्णपदक; नवोदित मुंबई श्री स्पर्धेत


| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

आपले वडील व बहिणीचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील शरीरसौष्ठवपटू अक्षय अशोक गवाने याने उराशी बाळगले होते. त्याने नुकतेच मुंबई मालाड येथे आयोजित नवोदित मुंबई श्री स्पर्धेत 55 वजनी गटात सुवर्णपदक पटकावले व आपल्या वडिलांचे व बहिणीचे स्वप्न पूर्ण केले. अक्षय अशोक गवाने राहणार कोल्हाण, इंदापूर, तालुका माणगाव. अक्षय खेडेगावात राहून आपले उच्च शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात मुंबईकडे गेला. एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये काम करू लागला. मुंबईला आल्यानंतर अक्षयला जिमची आवड निर्माण झाली. त्याचे प्रशिक्षक सुनील गावडे यांनी अक्षयला शरीरसौष्ठव स्पर्धेचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर अक्षयने पालघर श्री, वसई श्री स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

2019 मध्ये माणगाव मध्ये झालेल्या माणगाव श्री स्पर्धेत अक्षयने सुवर्ण पदक पटकावले. आता त्याचा खरा प्रवास येथून सुरू झाला. त्यात वडिलांचे स्वप्न होते की, तू आता मोठ्या स्पर्धेसाठी तयारी कर आणि यश खेचून आण, मग अक्षयने आपली कसरत चालू ठेवली. 2020 मध्ये वडिलांचं हृदयविकाराने निधन झाले. आता सगळे संपल्यासारखं झाले होते. वडिलांची साथ तुटली होती. अक्षयला काय करावं समजत नव्हत. आता घरात आपली आई आणि बहीण. अक्षयची बहीण अर्चनाने अक्षयला धीर व साथ देऊन पुढील वाटचालीत त्याच्या कायम सोबत राहिली. अक्षयने काही वर्षे गावाला इंदापूर येथे जिममध्ये प्रशिक्षण घेतले. तसेच आपल्या स्पर्धेचे नियोजन केले. तेव्हा रायगड श्री 2022 मध्ये त्याने 3 वेळा सुवर्ण पदक पटकावले. नंतर अक्षयने ठरवले की या क्षेत्रातच काम करायचं. यासाठी त्याला जिम पर्सनल ट्रेनर कोर्सचे विविध कोर्स पूर्ण करण्यासाठी त्याची बहीण अर्चना त्याच्या पाठी खंबीरपणे उभी राहिली.

आपले कोर्स पूर्ण करण्यासाठी मुंबई ते पुणे असा अक्षयचा प्रवास सुरू झाला. विविध कोर्स पूर्ण झाल्यानंतर मुंबई येथे मोठ्या जिममध्ये पर्सनल ट्रेनर म्हणून काम करू लागला व आपल्या बहिणीसोबत राहू लागला. दरम्यान, त्याला आपले घर व मोठ्या स्पर्धेची तयारी करण्यासाठी येणारा खर्च खूप भरमसाठ होता. अशा परिस्थितीतही अक्षयला आपल्या बहिणीने साथ दिली. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणासाठी तिने ही मेहनत घेतली. सकाळी 4 वाजता उठून डाएट बनवणे, जॉब करणे असा प्रवास चालू असताना अक्षयने नवोदित मुंबई श्री स्पर्धेत भाग घेऊन 55 वजनी गटात सुवर्णपदक पटकावले व आपल्या वडिलांचे व बहिणीचे स्वप्न बहिणीचे पूर्ण केले.

Exit mobile version