। मुंबई । प्रतिनिधी ।
वय झाल्यानंतर थांबायचं असतं, पण काही जण ऐकत नाही, 80 वय झालं तरी काहीजण निवृत्त होत नाहीत, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या या टीकेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे. बापाला रिटायर करायच नसतं… बाप हा बाप असतो, बाप कधी रिटायर होत नसतो, असा टोला आव्हाडांनी अजित पवारांना दिला आहे.
राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार शरद पवारांच्या वयावर सातत्याने टीका केली आहे. ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावे, राजकारणातून निवृत्ती घ्यावी, असे त्यांनी सुरूवातीलाच म्हटले होते. त्यानंतरही मिळेल त्या व्यासपीठावर अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून टीका करण्याची संधी सोडली नाही. शरद पवारांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे. मी कुठेही थांबण्याचा प्रश्नच येत नाही. मी आता आणखी जोमाने काम करणार आहे. वय 82 होऊ द्या किंवा 92 होऊ द्या, असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या होत्या.