नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
। तळा । वार्ताहर ।
तळा बाजारपेठ परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून या भटक्या कुत्र्यांच्या टोळीने शहरात अक्षरशः उच्छाद मांडला आहे. मागील काही दिवसांपासून तळा शहरात टोळीने फिरणार्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. यातील काही जण येणा-जाणार्या माणसांचा व वाहनांचा भुंकत जाऊन पाठलाग करत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरात तसेच वसाहतीमध्ये ठीकठिकाणी भटक्या कुत्र्यांचा कळप फिरत असल्याने त्याचा त्रास येथील रहिवाशांना होत आहे. रात्रीच्या वेळेस दुचाकीवरुन जाणार्या वाहनचालकाच्या अंगावर भटकी कुत्रे भुंकत जात असल्याने अपघाताला निमंत्रण होत आहे. या भटक्या कुत्र्यांवर तळा नगरपंचायतीने त्वरित कारवाई करून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी तळा वासीयांकडून करण्यात येत आहे. तळा शहरात नवनवीन वस्ती वाढत चालली आहे. त्यामध्ये समर्थनगर, अंबिकानगर, साईनगर यांसारख्या ठिकाणीदेखील भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडलेला आहे. लहान मुले आबालवृद्ध, वाहनचालक, दुचाकीस्वार यांच्या अंगावर धावून जखमी करण्याचे प्रकारही काही वेळा घडले आहेत. त्यामुळे तळा शहरात या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.