शेती पाण्याखाली गेल्याने रोपे कुजण्याची भीती

| वेणगाव | वार्ताहर |
सतत पडणार्‍या मुसळधार पावसात कर्जत तालुक्यातील भातशेती पाण्याखाली जाऊन शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भाताची रोपे पाण्याखाली गेल्याने दुबार भात पेरणीच्या विचाराने येथील शेतकरी चिंतेत पडला आहे.

तालुक्यातील अनेक गावांतील शेतजमिनीत पावसाचे पाणी शिरल्याने लावणीसाठी तयार झालेले भाताची रोपे (राब) पाण्याखाली झिरपून वाहून गेली आहेत. यामुळे शेतीची झिज होऊन बर्‍याच शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले असून, या संकटाची साधी पुष्टीसुद्धा करण्यास अद्याप शासनाचा एकही माणूस शेतकर्‍याच्या बांधावर गेला नाही, तर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास कधी येतील? असा प्रश्‍न शेतकर्‍याला पडला आहे.

तालुक्यातील वेणगाव, वदप, कुशिवली, गौरकांत, जंभिवली, बारणे, सलोख, तांबस, सावेळे, भोईरवाडी, मार्केवाडी, कुंडलज, पोसरी, तीवरे, तमनात, खांडपे, मुळगाव, कोंडीवडे, सापेले, वावे, बेंडसे, चांदई, वडवली, कडाव, पोटल पाली, वैजनाथ, मंडवणे, कराले वाडी, भाडीवली, सावरगाव, एकसल, मावगाव, बेकरे, देऊळ वाडी, मालवाडी, कोषाने, पिंगळस, जांबरुख, खांडस, नांदगाव, बळीवरे, बोरिवली, सुगवे, नालदे येथील गावच्या शेत जमिनीत पावसाचे पाणी जाऊन भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबतीत तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधला असता.

खूप पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जाऊन काही ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच नुकसान झाले असल्याचे समजले, पण पंचनामे करण्याचे बाकी आहे.

एस.एम. शेवाळे, तालुका कृषी अधिकारी, कर्जत

माजी दोन एकर जमीन पूर्ण कंबरभर पाण्याखाली गेली आहे. लावणीयोग्य राब पाण्याने झिरपून वाहून गेला आहे. आता दुबार भातपेरणी करणार कशी, असा प्रश्‍न पडला आहे. फार मोठा अस्मानी संकटाचा डोंगर आमच्यापुढे येऊन ठेपला आहे.

हरिश्‍चंद्र यादव, शेतकरी, कर्जत
Exit mobile version