। रसायनी । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतांची उपलब्धता, ऑनलाईन बुकिंग आणि वितरण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व शेतकरीहिताची करण्यासाठी कृषी विभागाने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ ही ऑनलाईन खत विक्री प्रणाली 15 ऑगस्टपासून कार्यान्वित केली आहे. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी कृषी केंद्रांवर वारंवार हेलपाटे मारण्याची गरज कमी होणार असून, मोबाईलवरूनच खताचा साठा तपासून बुकिंग करता येणार आहे.
यापूर्वी आवश्यक खत उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांना विविध कृषी केंद्रांवर जावे लागत होते. त्यामुळे वेळ व पैशांचा अपव्यय होत होता. नवीन ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकरी आपल्या मोबाईलवरून जवळच्या कृषी केंद्रातील खताचा उपलब्ध साठा तपासून आवश्यक खताचे बुकिंग करू शकणार आहेत. यामध्ये युरिया, डीएपी, सुफला तसेच इतर अनुदानित खतांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांनी मोबाईलवर ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ हे अप्लिकेशन डाउनलोड करून शेतकरी आयडी किंवा आधार क्रमांकाच्या माध्यमातून लॉगिन करावे. त्यानंतर आवश्यक खताची निवड करून जवळचे कृषी केंद्र निवडता येणार आहे. बुकिंग पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांक मिळणार असून, तो संबंधित कृषी केंद्रावर दाखवून खताची खरेदी करता येणार आहे.
स्मार्टफोनची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांसाठीही प्रशासनाने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अशा शेतकऱ्यांना जवळच्या सीएससी केंद्र, पीएसीएस, अधिकृत खत विक्रेता किंवा एफपीओच्या माध्यमातून ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. यासाठी शेतकरी आयडी, आधार क्रमांक तसेच जमीन व पिकांची आवश्यक माहिती उपलब्ध असणे गरजेचे आहे.
ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर मिळालेला क्यूआर कोड किंवा टोकन क्रमांक दोन दिवसांसाठी वैध राहणार आहे. या कालावधीत खताची खरेदी न झाल्यास शेतकऱ्याला पुन्हा बुकिंग करता येणार आहे. तसेच शेतकऱ्याला स्वतः कृषी केंद्रावर जाणे शक्य नसल्यास, त्याच्या वतीने अधिकृत प्रतिनिधीलाही खत घेता येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात खतांची उपलब्धता सुरळीत राहावी आणि कोणत्याही भागात खताची कमतरता भासू नये, यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. नवीन प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय व क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी तसेच खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ऑनलाईन बुकिंग, खताची उपलब्धता किंवा वितरण प्रक्रियेत अडचण निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी, गुणनियंत्रण निरीक्षक किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या डिजिटल प्रणालीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन खताची उपलब्धता तपासावी आणि ऑनलाइन बुकिंगद्वारे खताची सुलभपणे खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Online Fertilizer Booking: रायगडमध्ये खत खरेदी आता ऑनलाईन
