मुरूडमध्ये मोजक्याच पर्यटकांची हजेरी

काशीद बीचवर वर्दळ; वॉटर स्पोर्ट्स बंद
मुरुड जंजिरा | वार्ताहर |
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर शनिवारपासून वर्दळ सुरू झाल्याचे दिसून आले. प्रसिद्ध काशीद बीचबर पर्यटक मोठ्या संख्येने आले असून, मुरूडमध्ये मात्र मोजक्याच पर्यटकांची हजेरी दुपारी दिसून आली.
मुरुडमधील साईगौरी रेस्ट हाऊसचे मालक हिराबाई बैले यांनी सांगितले, की शनिवारी 25 ते 30 टक्के पर्यटक मुरूडमध्ये आले असून, त्यातील काहींनी समुद्रात आंघोळीचा मनसोक्त आनंद लुटला. मुरुडच्या अडीच कि.मी. समुद्र किनारपट्टीवर फिरण्याचा पर्यटक आनंद लुटत आहेत. प्रदूषणमुक्त हवामानामुळे पर्यटकांची मुरुड तालुक्याला विशेष पसंती आहे. काशीदचे रहिवासी सुनील दिवेकर यांनी सांगितले, की काशीद बीचवर शनिवारपासून भरपूर पर्यटक येण्यास सुरूवात झाली आहे; परंतु शासनाने काशीद येथील वॉटर स्पोर्ट्स बंदचे आदेश दिल्याने ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक वैतागले असून, आमचेदेखील नुकसान होत आहे.
मुरूड तालुक्यात पर्यटन व्यवसायाबाबत चालू-बंदचा खेळ सुरू असल्याने पर्यटन व्यवसाय ठप्प होताना दिसत आहे. मुरूड तालुक्यात पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आहे. परंतु, कोरोना आल्यापासून कोलमडून पडला असून, अनेक जण बेरोजगार झाले आहेत.शासनाने या व्यवसायाला सुदिन आणण्यासाठी काही निर्बंध शिथिल करणे गरजेचे आहे, असे मत मुंबईतून आलेले पर्यटक विलास जाधव, गौरी पाटील, विद्या पोतदार यांनी व्यक्त केले. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढेल, असेही या मंडळींनी सांगितले.

Exit mobile version