मृताच्या वारसांना पंधरा लाखांची मदत

| चिपळूण | प्रतिनिधी |
तालुक्यातील फुरुस येथील गव्यारेड्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या सतीश जाधव यांच्या कुटुंबियांना वन विभागाकडून पंधरा लाखांची मदत जिल्हाधिकारी बी.एन. पाटील व आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आली.

फुरुस, ता. चिपळूण येथील तरूण सतीश जाधव याच्यावर 18 जुलै रोजी गव्यारेड्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर प्रमाणात जखमी झाले होते. त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात सात ते आठ दिवस उपचार सुरू होते; परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी अक्षता जाधव, मुली आर्या व अदिती जाधव, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाच्यावतीने दिली जाणारी मदत तातडीने मिळावी यासाठी आमदार शेखर निकम व वन विभागाचे अधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा करून 15 लाखांची मदत प्राप्त झाली. प्राप्त झालेली मदत मृताच्या वारसांना जिल्हाधिकारी बी.एन. पाटील, आ. शेखर निकम, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, सहाय्यक वनरक्षक चिपळूण सचिन निलख, माजी सभापती पूजा निकम, वनपाल डी.आर. भोसले यांच्या उपस्थितीत सतीश जाधव यांची पत्नी अक्षता सतीश जाधव व कुटुंबियांकडे 5 लाखांचा धनादेश व 10 लाखाची एफडी प्रमाणपत्र देण्यात आले. सदरची मदत तातडीने मिळावी यासाठी विभागीय वनाधिकारी चिपळूण दिपक खाडे, परिक्षेत्र वन अधिकारी राजश्री किर, सहाय्यक वनरक्षक चिपळूण सचिन निलक व वन विभागाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Exit mobile version