| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नेरुळ सेक्टर 16 ए परिसरातील वुडलँड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी (प्लॉट क्र. 63) येथे मंगळवारी (दि.21) सायंकाळी पाचव्या मजल्यावरील स्लॅबचा संपूर्ण भाग कोसळून चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये पडल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेमुळे इमारतीला मोठे भगदाड पडले असून, परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही क्षणांच्या फरकाने मोठा अनर्थ टळल्याचे समोर आले आहे.
ज्या घरात स्लॅब कोसळला, त्या वेळी घरातील व्यक्ती किचनमध्ये असल्याने त्यांचा जीव वाचला. तसेच चौथ्या मजल्यावर कोसळलेला स्लॅब पुढे तिसऱ्या मजल्यावर अडकून थांबल्याने खालील मजल्यांवर मोठे नुकसान होण्यापासून बचाव झाला. घटनेनंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागासह नेरुळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य हाती घेत इमारतीतील सर्व नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. प्रभावित घरातील साहित्य बाहेर काढण्यात आले असून, नागरिकांना धोक्याच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची प्रक्रिया काही काळ सुरू होती.
सदर इमारतीत एकूण 21 कुटुंबे वास्तव्यास होती. महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी केली. यापैकी काही कुटुंबांनी नातेवाईकांकडे तात्पुरता आश्रय घेतला आहे, तर उर्वरित कुटुंबांची सोय कुकशेत, सेक्टर 14 येथील प्रभाग समिती कार्यालयाजवळील नवीन मार्केट इमारतीत करण्यात आली आहे.
महापालिकेकडून ही इमारत धोकादायक ठरवून सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, इमारतीच्या संरचनात्मक सुरक्षिततेचा सखोल तपास करण्यात येणार आहे. बांधकामाची गुणवत्ता, देखभाल आणि रचनेतील त्रुटी यांचा अभ्यास करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या घटनेनंतर नेरुळ परिसरातील जुन्या आणि देखभाल न झालेल्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून इमारतींची नियमित रचनात्मक तपासणी सक्तीची करण्याची मागणी होत असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
नेरुळमध्ये पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला
