दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. परिसरातील खड्डे, अपुऱ्या यंत्रणेमुळे रुग्णालय चर्चेत आले आहे. याच रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील मेल मेडिकल वॉर्डमधील स्लॅब रविवारी दुपारी कोसळला. सुदैवाने त्याठिकाणी कोणीच नसल्याने जीवितहानी टळली. यापूर्वीदेखील स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागाच्या बाजूला असलेल्या डायलेसीस सेंटरलगत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी स्लॅब कोसळला होता. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील मेल मेडिकल वॉर्डमध्ये स्लॅब कोसळला. या वॉर्डमध्ये तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात होते. सुदैवाने जीवितहानी टळली. जिल्हा रुग्णालयाच्या दुरूस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. पीओपीसह ठिकठिकाणी प्लास्टरची कामे करण्यात आली. मात्र, रुग्णालयात सतत पडत असलेल्या स्लॅबमुळे दुरुस्तीवर केलेला खर्च वाया जात असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.